न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ मार्च २०२०) :- करोना च्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात १३ मार्च पासून साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ लागू करण्यात आला आहे. एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी सर्व शॉपिंग मॉल, सर्व दुकाने, सर्व आस्थापना ३१ मार्च २०२० पर्यंत बंद करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. समज देऊनही दुकाने सुरु ठेवल्यास पोलिसांकडून संबंधित दुकानदारांवर भारतीय दंड विधान कलम १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
अत्यावश्यक किराणा सामान, दूध, भाजीपाला, औषधे आणि अन्य जीवनावश्यक वस्तूंची दुकाने यातून वगळण्यात आली आहेत. तरीही जिल्हाधिकाऱ्यांचा नियम डावलून शहरात दुकाने सुरूच आहेत. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी गर्दी टाळण्याबाबत कडक उपाय योजना करण्याचे आदेश पोलीस अधिका-यांना दिले आहेत. त्यानुसार सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कठोर कारवाई केली जात आहे. चिखली पोलिसांनी आदेशाचे उल्लंघन करणा-या १६ दुकानचालकांवर आज गुन्हे दाखल केले आहेत. तसेच पिंपरी परिसरातही बरीच दुकाने सुरु असल्याचे निदर्शनास आले आहे. यावरही कारवाई होणार का? अशी कुजबुज नागरिकांमध्ये सुरु आहे.













