- पिंपरी चिंचवड शहरवासियांवरील दादांचे प्रेम कमी झाले ?
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ मार्च २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात करोना या विषाणूने थैमान घातलेले आहे. जवळपास अकरा करोनाग्रस्त रुग्ण शहरात आढळले आहेत. करोनाग्रस्त रुग्णांच्या बाबतीत पिंपरी चिंचवड शहर संपूर्ण राज्यात अव्वल ठरले आहे.
अशा परिस्थितीत महापालिका प्रशासन व सत्ताधारी पक्ष केवळ आढावा बैठका घेण्यातच व्यस्त आहेत. शहरातील नागरिकांना मास्कही वेळेवर उपलब्ध होत नाहीत. लोक खुलेआम स्वतःची सुरक्षा वाऱ्यावर सोडून एकमेकात मिसळत आहेत. महापालिकेची जनजागृती हवी तशी होताना दिसत नाही. महापालिकेच्या जनजागृती पथकाची सुरक्षा साधनांविना फरफट होताना दिसून येत आहे. एकेकाळी आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका असा बिरूद मिरवणाऱ्या महापालिकेत वास्तव्य करणाऱ्या नागरिकांच्या नशिबी गुणवत्तापूर्वक मास्कही नाहीत, ही फार मोठी शोकांतिका आहे. सर्व कारभार उफारटा सुरु आहे.
मात्र, अशा परिस्थितीत कोणत्याही पदाधिकाऱ्याला सूचना न देताच, अगदी पहाटेच शहरातील विकासकामांची पाहणी करण्यासाठी येणारे, वेळेत पाहणीस्थळी न पोहोचल्यावर पदाधिकाऱ्याला झापणारे, शहरवासियांना हवेहवेसे वाटणारे, आपुलकीने विचारणारे आपले दादा, म्हणजेच पुण्याचे पालकमंत्री अजित दादा पवार शहरावर भीषण असे संकट कोसळत असताना आहेत कुठे ? असा सवाल शहरातील नागरिक विचारू लागले आहेत. तसेच शहरात दादाच ही परिस्थिती नियंत्रणात आणू शकतील, अशी अटकळही काही नागरिक खासगीत बांधू लागले आहेत. मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर साधी आढावा बैठकाही अजित पवारांनी शहरात घेतलेली नाही. की कुठली विचारपूसही केली नाही. त्यामुळे नक्की दादा आहेत कुठे? पिंपरी चिंचवड शहरवाशियांवरील दादांचे प्रेम कमी झाले? की बदलत्या राजकीय भूमिकेमुळे दुर्लक्ष करीत आहेत, अशीही चर्चा काही नागरिक खासगीत करू लागले आहेत.













