न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० मार्च २०२०) :- अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकान बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. या आदेशाबाबत जनजागृती नंतरही दुकाने सुरू ठेवणाऱ्या व्यावसयिकांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत ५८ व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली.
पिंपरी चिंचवड शहरासह जगभरात करोना ‘ या साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापना बंद करण्याचे आदेश दिले आहेत. कारवाईची सुरुवात सर्वप्रथम चिखली पोलिसांनी केली.
याबाबत चिखली पोलिसांनी ध्वनीक्षेपकावरून चिखली परिसरातील सर्व नागरिकांना बुधवारी (दि. १८) आवाहन केले होते. मात्र त्यानंतरही गुरुवारी अनेक दुकानदारांनी पोलिसांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करीत दुकाने सुरूच ठेवली. यामुळे चिखली पोलिसांनी १६ दुकानदारांवर भारतीय दंड विधान कलम १८८ नुसार गुन्हे दाखल केले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक वा सतीश माने यांनी दिली.
पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. त्यानंतर शहरातील इतर पोलीस ठाण्यांकडून अशाच प्रकारची कारवाई सुरु झाली. करोना चा प्रादुर्भाव वाढत असताना शहरातील रस्ते आणि बाजारपेठांमध्ये शुकशुकाट दिसत आहे. परंतु शहराच्या काही भागांमध्ये मात्र काही टपऱ्या आणि दुकानांसमोर नागरिक उभे राहत असल्याने गर्दी होत होती. वारंवार आवाहन करूनही येथील गर्दी कमी होत नसल्याने अखेर पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी पोलिसी खाक्या दाखवित टपऱ्या आणि दुकाने बंद करण्यास भाग पाडले.













