न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ मार्च २०२०) :- दुबईहून आलेल्या पुण्यातील पती – पत्नी आणि मुलीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. तेथूनच महाराष्ट्रातील कोरोनाच्या प्रादर्भावाला सुरुवात झाली. एकाच कुटुंबातील पहिले तीन कोरोनाबाधित रुग्ण नायडू रुग्णालयात दाखल होऊन रविवारी (२२ मार्च) रोजी १४ दिवस पूर्ण झाले. आज सोमवारी या तिघांची कोरोनाची चाचणी होणार आहे. आमची पहिली चाचणी आणि २४ तासांनी दुसरी चाचणी होईल. त्यानंतर घरी सोडण्याचा निर्णय घेतला जाईल. आता घरी जाण्याचे वेध लागले आहेत, अशी भावना कोरोनाबाधित रुग्णाने व्यक्त केली.
होळीच्या दिवशी ( ९ मार्च ) राज्यातील पहिला कोरोनाबाधित रुग्ण पुण्यात आढळल्याने एकच खळबळ उडाली. त्यापाठोपाठ रुग्णाची पत्नी आणि मुलगीही कोरोनाबाधित असल्याचे समोर आल्याने पुण्यावरील कोरोनाचे सावट आणखी गडद झाले. तसेच, त्यांनी मुंबईतून पुण्याला येण्यासाठी केलेल्या कॅबचा चालकही बाधित आढळून आला. त्यानंतर त्यांच्या सोबत दुबईहून आलेल्या आणखी काही जणांना कोरोनाची लागण झाली. हा आकडा वाढत गेल्याने संपूर्ण राज्यासह देशातील सर्व यंत्रणा अलर्ट झाल्या. नायडू रुग्णालयाला एक प्रकारे छावणीचे स्वरूप आले.
कोरोना विषाणूची बाधा होण्याचा कालावधी २ ते १४ दिवस एवढा आहे. हा कालावधी पूर्ण झाल्याने आरोग्य विभागाच्या प्रोटोकॉलनुसार, सोमवारी तिघांची कोरोनाची चाचणी केली जाणार आहे. या चाचणीच्या अहवालानंतर संबंधितांना घरी सोडण्याचा निर्णय घेतला जाईल. रविवारी आम्हाला नायडूमध्ये दाखल होऊन १४ दिवस पूर्ण झाले. सुरुवातीचे दोन दिवस आम्ही प्रचंड घाबरलो होतो. हळूहळू परिस्थितीची कल्पना येत गेली. डॉक्टर, नर्स सर्वजण सहकार्य करत आहेत. चहा, नाश्ता, जेवण खोलीबाहेरील टेबलवर ठेवले जाते. खोलीची दिवसातून एकदा व्यवस्थित स्वच्छता केली जाते. दिवसातून २ वेळा डॉक्टर, तर दोनदा असिस्टट डॉक्टर तपासणीसाठी येतात. मी, पत्नी आणि मुलगी तिघांना गेल्या आठ दिवसात खोकला, शिंक, ताप असा काहीच त्रास झालेला नाही.













