न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ मार्च २०२०) :- कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्य शासनाने जमावबंदीचे आदेश लागु केले आहेत. त्यामुळे नागरिकांना मिळकत कर भरणा करणे शक्य होत नाही. तसेच, मुदतीमध्ये मिळकत कर न भरल्यास दंडात वाढ होणार आहे. त्यामुळे पालिकेने थकबाकीसह संपूर्ण मिळकतकर भरल्यास दंडामध्ये ९० टक्के सवलत देण्याचे जाहीर केले आहे. ही सवलत ३१ मार्चपर्यंत राहणार आहे. नागरिकांनी www. pcmcindia.gov.in या महापालिकेच्या संकेतस्थळाच्या माध्यमातून ऑनलाईन कर भरावा. कर संकलन कार्यालयात गर्दी करू नये, असे आवाहन झगडे यांनी मिळकतधारकांना केले आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी पिंपरी – चिंचवड महापालिकेने कर्मचाऱ्यांची संख्या २५ टक्क्यांपर्यंत आणली आहे. तसेच यातील काही कर्मचारी कोरोना संदर्भातील उपाययोजनांमध्ये गुंतले आहेत. मनुष्यबळ कमी झाल्याने मिळकत कर, पाणीपट्टी, तसेच एलबीटी, बांधकाम परवानगी व इतर शुल्क वसुलीस अडचणी निर्माण झाल्या आहेत. जमावबंदी लागू केल्याने सर्वच कामे बंद आहेत.
बांधकाम व्यावसायिक बांधकाम परवानगी घेण्यास येत नसल्याने पालिकेच्या महसूल वसुलीवर विपरीत परिणाम झाला आहे. सन २०१९ – २० चे आर्थिक वर्षे ३१ मार्चला संपते. ही मुदत संपण्यास केवळ ८ दिवसांची मुदत व शिल्लक आहे. मात्र, कोरोनामुळे या वसुलीवर विपरीत परिणाम झाला आहे. आठवड्यापूर्वी पालिकेत नागरिकांना येण्यास बंदी करण्यात आली. त्यानंतर जमावबंदीचा आदेश लागू केल्याने बांधकामे बंद झाली. यंदाच्या वर्षी बांधकाम विभागाला ७०० कोटींचे टार्गेट होते. आतापर्यंत एकूण ६५० कोटींचे शुल्क जमा झाले आहे. गेल्या वर्षी एकूण ५०९ कोटी रुपये तिजोरीत जमा झाले होते, असे कार्यकारी अभियंता राजेंद्र राणे यांनी सांगितले.















