साखर, मूगडाळ, गव्हाचे पीठ आदींचा साठाही संपण्याच्या मार्गावर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ मार्च २०२०) :- करोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात किराणा साहित्याची मागणी वाढल्याचे चित्र सध्या पाहण्यास मिळत आहे. घरोघरी नागरिकांकडून किराणा साहित्याचा साठा करून ठेवला जात आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठ्याचे प्रमाण कमी असल्याने अन्नधान्याचा तुटवडा जाणवू शकतो, असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
सध्या पिंपरीतील घाऊक बाजारात साखर, गव्हाचे पीठ, मूगडाळ आदींचा साठा संपत आल्याचे घाऊक विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. पिंपरी किराणा असोसिएशनचे अध्यक्ष श्याम मेघराज याबाबत माहिती देताना म्हणाले, सध्या किराणा साहित्याची मागणी खूपच वाढली आहे. संत तुकाराम सहकारी साखर कारखान्यातून दोन ते तीन दिवसांनी साखर मिळत होती. आम्ही त्यामुळे साखरेचा साठा केलेला नाही. सध्या मागणी वाढली आहे. तुलनेत कारखान्यातून पुरेशी साखर मिळत नसल्याने अडचण वाढली आहे. पर्यायाने, किरकोळ विक्रेत्यांना साखर पुरवठा करणे गैरसोयीचे होत आहे.
त्याशिवाय मूगडाळ, गव्हाचे पीठ आदींचा साठाही संपत आला आहे. करोनाच्या धास्तीने पुणे आणि पिंपरी – चिंचवड परिसरात धान्याची वाहतूक करणाऱ्या गाड्या आणण्यास देखील अडचणी येत आहेत. गहू, तांदूळ आदी उपलब्ध आहे. त्यांचा सध्या तरी तुटवडा जाणवत नाही.















