- कोरोनापासून बचावासाठी स्वस्त धान्य दुकानदारांची मास्क व सॅनिटायझरची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ मार्च २०२०) :- सध्या कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे चित्र आहे. त्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्याचे आवाहन राज्य शासनाने केले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा बंद ठेवण्याची सूचना केली आहे. त्यानुसार पिंपरी चिचवड शहरातील सर्व भागातील दुकाने, हॉटेल बंद आहेत. मात्र, अत्यावश्यक सेवेचा भाग म्हणून असणाऱ्या स्वस्त धान्य दुकानांतर्गत शिधापत्रिकाधारकांना धान्य वाटप केले जात आहे. दुकाने उघडी न ठेवता मात्र, शिधापत्रिकाधारक आल्यास त्यांना त्वरित धान्य देण्याची मोहीम सुरू केली आहे, अशी माहिती ऑल फेरप्राईज शॉपकिपर्स असोसिएशनचे खजिनदार विजय गुप्ता यांनी दिली.
गुप्ता म्हणाले की, महिन्याच्या सुरुवातीला धान्य खरेदीसाठी शिधापत्रिकाधारक धान्य दुकानदारांसमोर गर्दी करतात. त्यामुळे निगडी येथील शिधापत्रिका कार्यालयांतर्गत येणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना दोन महिन्यांचे धान्य मिळणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी दुकाने बंद केली आहेत. स्वस्त धान्य दुकानदारांना शासनाकडून तशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच स्वाईप मशिनवरील अंगठ्याची सक्ती न करता त्यांना त्वरित धान्य देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असेही ते म्हणाले.
पूर्वी स्वाईप मशिनवर अंगठा घेऊन उपलब्ध धान्य दिले जात होते. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव रोखावा म्हणून शिधापत्रिका कार्यालयाकडूनही काळजी घेतली जात आहे. सर्वांच्या अंगठ्याचे ठसे न घेण्याची सूचना देण्यात आली आहे. दुकानदार स्वतःचा अंगठा देऊन धान्य देत आहे. दोन महिन्यांसाठीचे पुरेल एवढे धान्य दिले जात आहे. त्यामुळे शिधापत्रिकाधारकांची देखील गैरसोय टळली जात आहे. या बरोबरच स्वस्त दुकानदारांना स्वतःही घराबाहेर न पडण्याचे, वेळोवेळी स्वच्छता व हात धुण्याचे आवाहनही केले आहे. तसेच शासनाने राज्यातील स्वस्त दुकानदारांना करोनापासून बचावासाठी उच्च प्रतीचे मास्क व सॅनिटायझर मोफत उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणीही यावेळी गुप्ता यांनी केली आहे.













