न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ मार्च २०२०) :- सर्दी व खोकला यातून बाहेर पडणाऱ्या थेंबाबरोबर ( ड्रॉपलेटस् ) कोरोना विषाणूचा हवेतूनही प्रसार होऊन संसर्ग होत असल्याचे पुढे आले आहे. कोरोना विषाणूबाधित रुग्णांच्या सर्दी व खोकल्यातील ड्रॉपलेटसुद्वारे संपर्कातील व्यक्तीला संसर्ग होऊ शकतो. तसेच संबंधित स्रावातून बाहेर पडलेला विषाणू हा फर्निचर वा अन्य वस्तूंवर पडल्यास १० ते १२ तास जिवंत राहू शकतो, असे संशोधनातून पुढे आले.
बाधित रुग्णाने मास्क वापरावेत, हँड सॅनिटायझर्सचा ही सातत्याने वापर करावा, अशा सूचना यापूर्वीच दिल्या आहेत. बाधित व्यक्तीपासून किमान दोन मीटरचे अंतर राखावे. जेणेकरून त्याचे विषाणू तुषारामार्फत पोहोचणार नाहीत. या विषाणूची हवेत राहण्याची क्षमताही ८ तासांवर असल्याची निरीक्षणे पुढे आली आहेत. आता बाधित रुग्णांवर उपचार करणारे वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी काय उपाय योजावेत? यावर जागतिक आरोग्य संघटना गांभीर्याने विचार करत आहे.
चीनमध्ये कोरोना विषाणूच्या प्रसाराचा प्रोटोकॉल अभ्यासण्यात आला होता. त्यानुसार जागतिक आरोग्य संघटनेने या विषाणूंना प्रतिबंध करण्यासाठी संपूर्ण जगभरात एक मार्गदर्शक सूचनावली जारी केली; परंतु त्यानंतर इराण , इटली आणि अमेरिका येथे ज्या पद्धतीने विषाणू वेगाने पसरला त्यामुळे शास्त्रज्ञांच्या भुवया उंचावल्या आहेत. केवळ ड्रॉपलेटसच्या माध्यमातूनच हा प्रसार होत नाही, तर त्याला अन्य कारणे असावीत या भूमिकेतून हे संशोधन सुरू होते. त्यामध्ये तापमान, आर्द्रता आणि सूर्याच्या अतिनील किरणांचा काय परिणाम होतो, याचा अभ्यास झाला. यात हा विषाणू हवेतील सूक्ष्म कणांबरोबर संयुग निर्माण करून (एरोसेल) संसर्गित होतो असे निरीक्षणपुढे आले. यामुळे हवेतून या संसर्गाचा प्रसार होत असल्याच्या शंकेला पुष्टी मिळते.













