- नागरिकांनी आरोग्याची खबरदारी म्हणून घराबाहेर पडू नये – नगरसेवक शैलेश मोरे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ मार्च २०२०) :- जगभरात कोरोना या विषाणूने थैमान घातले आहे. पिंपरी चिंचवड शहरात १२ करोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. तर हजारांपेक्षा अधिक नागरिक होम क्वारंटाईन आहेत. त्यामुळे गाफील न राहता कोरोना विषाणूला प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नगरसेवक शैलेश मोरे यांच्या वतीने एम्पायर इस्टेट सोसायटी, विसडम पार्क, सेंग्रीला हौसिंग सोसायटी परिसरात नुकतीच स्वच्छता मोहीम व सोडिअम हायपोक्लोराईट औषधाची फवारणी करण्यात आली.
नगरसेवक शैलेश मोरे म्हणाले की, निवासी इमारतीमध्ये कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर औषध फवारणी करण्याचा नागरिकांकडून आग्रह करण्यात येत आहे. जेणेकरुन त्या परिसरामध्ये कोठेही विषाणू असल्यास तो नष्ट करण्यास मदत होईल. तसेच उर्वरित परिसरात विषाणूचा प्रादुर्भाव रोखता येईल. त्यामुळे वरचेवर आवश्यकता भासल्यास पुन्हा या परिसरात औषध फवारणीची मोहीम राबविण्यात येईल.
तसेच नागरिकांनीही आपल्या आरोग्याची खबरदारी म्हणून घराबाहेर पडू नये. एकमेकांपासून ठराविक अंतर राखावे. अधिक माहितीसाठी व आवश्यक मदत भासल्यास जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन मोरे यांनी परिसरातील नागरिकांना केले आहे.


















