न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ मार्च २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात करोना या संसर्गजन्य विषाणूने थैमान घातले आहे. राज्य शासनाने राज्यात लॉकडाऊन केले आहे. त्यामुळे संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरात २१ दिवस कडकडीत बंद पुकारण्यात आलेला आहे. शहरातील चाकरमानी व हातावरील पोट असणारे नागरिक त्यामुळे मेटाकुटीला आले आहेत. हाताला काम नसल्यामुळे व घरातील अन्नधान्य संपत आल्याने जगायचे कसे हा प्रश्न त्यांच्यापुढे सतावत आहे. याची जाणीव असल्याने प्रभाग क्रमांक १३, निगडी गावठाण परिसराचे नगरसेवक व शहर मनसेचे अध्यक्ष सचिन चिखले यांनी पुढाकार घेतला. सेक्टर २२ मधील संग्रामनगर परिसरातील काही गरीब व ज्यांचे हातावर पोट आहे, अशा नागरीकांना किराणा मालाचे वाटप करण्यात आले. जेणेकरून पुढील काही दिवस कोणीही उपाशी राहणार नाही.
नगरसेवक चिखले म्हणाले की, मागील काही दिवसांत पिंपरी चिंचवड शहरात करोनाचे रुग्ण आढळले असून, शहरवासियांमध्ये काळजीचे वातावरण आहे. कोरोनामुळे भलेभले हवालदिल झाले आहेत. अनेकांचा व्यवसाय चौपट झालेला आहे. त्यामुळे हातावरील पोट असणाऱ्या गोरगरीब नागरिकांची अवस्था बिकट झालेली आहे. त्यामुळे त्यांना जमेल तेवढी मदत करीत आहे. या आधीही शहरात मास्क व सॅनिटायझरचा तुटवडा असल्यामुळे जंतूसंसर्ग पसरण्याचा धोका ओळखून निगडी गावठाण परिसरात मोफत सॅनिटायझर व मास्कचे वाटप केले. तसेच करोना या विषाणूबाबत घ्यावयाच्या खबरदारीची नागरिकांमध्ये जनजागृतीही केली. आताही करीत आहे.
या कामी माजी नगरसेविका अश्विनी चिखले, प्रभागातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, नगरसेवक सचिनभाऊ चिखले मित्र मंडळ, निगडी गावठाण मित्र मंडळ, वॉर्डातील सर्व पदाधिकारी यांचेही मार्गदर्शन मिळत आहे. त्यामुळेच या गोष्टी शक्य होत आहेत.
तसेच करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रभागातील निगडीगाव, साईनाथनगर व यमुनानगर परिसरात स्व-खर्चातून सॅनेटराइज (सोडियम हायपोक्लोराईट व बॅक्टोडेक्स औषध) कोरोना विषाणु जंतुनाशक फवारणीही सुरु केली आहे. वेगवेगळ्या स्तरावर प्रभागात जनजागृतीचे काम सुरु आहे. नागरिकांनी या आजाराची भीती बाळगू नये. आरोग्याची काळजी घेण्याबरोबरच महापालिकेने वारंवार केलेल्या सूचनांनुसार घरी राहून स्वत:बरोबरच इतरांचीही काळजी घ्यावी, असे आवाहन नगरसेवक सचिन चिखले यांनी केले आहे.















