न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ मार्च २०२०) :- कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी पहिल्या टप्यात पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने केलेल्या उपाययोजनामुळे गेल्या १८ दिवसांत पॉझिटिव्ह आढळलेल्या १२ पैकी तीन जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आल्याने शुक्रवारी घरी सोडले होते. त्यानंतर उर्वरित ९ पैकी ५ जणांचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने रविवारी आज त्यांना घरी सोडण्यात आले. त्यांच्यावर गेल्या १४ दिवसांपासून भोसरीमधील नवीन रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, त्यांना दोन आठवडे होम क्वॉरंटाइन राहण्यास उपचार करणारे डॉ. लक्ष्मण गोफने यांनी सांगितले आहे.
एकाच कुटुंबातील चार जणांना करोना विषाणूची बाधा झाली होती. यात दोन महिला, १२ वर्षाची मुलगी आणि मुलगा होता. तर दुसऱ्या एका तरुणावर देखील भोसरी येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. आज अखेर ८ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. चीनमध्ये कोरोनाने धुमाकूळ घातल्यानंतर देशातही या विषाणूचा प्रादुर्भाव वाढला आहे. पिंपरी – चिंचवड शहरात बारा मार्चला पहिला रुग्ण सापडला होता. त्यांनतर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी कडक उपाययोजना केल्या. वैद्यकीय आणि आरोग्य विभागाचे नियोजन केले. परदेशातून येणाऱ्या आणि आलेल्या नागरिकांवर नजर ठेवली होती. नागरिकांना होम क्वॉरंटाइन केले होते. त्यांच्यावर ११२ टीम लक्ष ठेवून आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये पहिले ३ रुग्ण ११ मार्चला आढळून आले होते. या तिघांनी पुण्यातील दुबईला गेलेल्या दाम्पत्याबरोबर प्रवास केला होतो. एकाच दिवशी ३ रुग्ण आढळल्याने शहरात खळबळ उडाली होती. उपचारानंतर त्यांना शुक्रवारी घरी सोडले होते. त्यामुळे रुग्ण संख्या ९ झाली होती. त्यापैकी ५ जणांचे दोन तपासणी अहवाल शनिवारी रात्री प्राप्त झाले. ते निगेटिव्ह असल्याने आज त्यांना घरी सोडण्यात आले. ही मोठी दिलासादायक बातमी आहे. त्यामुळे रुग्णाची संख्या घटून ४ झाली आहे. यावेळी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस यांनी टाळ्या वाजवून करोनामुक्त व्यक्तींचा उत्साह वाढवत डॉक्टरांचे कौतुक केले आहे.