- राज्यपालांच्या कोट्यातून विधान परिषदेवर जाणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ एप्रिल २०२०) :- राज्यात करोनाचा उपद्रव झाल्यानंर सर्वच कार्यक्रम रद्द करण्यात आले. निवडणूक आयोगानं विधान परिषदेची निवडणुकही पुढे ढकलली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी लागते की, काय अशी चर्चा सुरू झाली होती. त्यावर आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत तोडगा काढण्यात आला. उद्धव ठाकरे यांना राज्यपालांच्या कोट्यातून विधान परिषदेत पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात राज्यपालांकडे शिफारस करण्यात येणार आहे.
करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता निवडणूक आयोगाने राज्यातील विधान परिषदेची निवडणूक लांबणीवर टाकली. याचा मुख्यत्वे फटका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बसू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. कारण घटनेतील १६४ (४) कलमानुसार, विधिमंडळाचा सदस्य नसलेल्याला सहा महिन्यांत सदस्य होणे बंधनकारक असते. यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना २७ मेपूर्वी सदस्य होणे आवश्यक आहे.
विधान परिषद निवडणूक लांबणीवर पडली असली, तरी उद्धव ठाकरे यांचा विधिमंडळात जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यात उद्भवलेल्या करोनाच्या संकटाबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आमदार होणं आवश्यक होतं. गुरूवारी (९ एप्रिल) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याविषयावर चर्चा झाली. विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या कोट्यातून उद्धव ठाकरे यांना विधिमंडळाचं सदस्यत्व देण्याचा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात लवकरच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे शिफारस केली जाणार आहे.













