न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 21. जून. 2020) :- महावितरण कंपनीच्या भोगळ कारभारामुळे उद्योजकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे . भोसरी येथील एका लघुउद्योगाचे एका महिन्याचे वीजबिल ८० कोटी आकारण्यात आले होते , मात्र चूक लक्षात आल्यानंतर महावितरण कंपनीच्या अधिका-यांनी दुरुस्ती करून देत ८४ हजार १५० रुपये आकारल्याचे वीजबिल संबंधित उद्योजकाला दिले .
पिंपरी – चिंचवड लघुउद्योग संघटनेचे सभासद बाबू जॉन यांचा प्लास्टिक मोल्ड तसेच इंजिनियरिंगशी संबंधित लघुउद्योग आहे . भोसरी येथे प्राधिकरण हद्दीत पेठ क्रमांक दहामध्ये साई प्रोफाइल नावाने जॉन यांची कंपनी आहे . या कंपनीचे दरमहा एक ते दीड लाख रुपयांपर्यंत वीजबिल येते . महावितरणने मे महिन्यासाठी ८० कोटी रुपये वीजबिल आकारले . लॉकडाऊनमुळे सर्वच उद्योग ठप्प झाले . लॉकडाऊनमध्ये शिथीलता आल्यानंतर उद्योग सुरू करण्यासाठी सशर्त परवानगी देण्यात आली . त्यामुळे उद्योग अद्याप पूर्ण क्षमतेने सुरू झालेले नाहीत . त्यात लघुउद्योग सुरू करण्यात मोठ्या अडचणी आहेत . पुरेसे काम नसल्याने वीजवापर कमी होत आहे .
तांत्रिक कारणांमुळे विजबिलावर चुकीची रक्कम नमूद झाली होती . ही बाब लक्षात आल्यानंतर लागलीच त्यात सुधारणा करण्यात आली . संबंधित ग्राहकास दुरुस्ती केलेले विजबिल देण्यात आले आहे.
– राहुल गवारे , कार्यकारी अभियंता , महावितरण , भोसरी शाखा.