न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७. जुलै. २०२०) :- पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी शालेय विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धन समिती (ईसीए) च्या वतीने शाडू मूर्तीचे प्रशिक्षण दिले जाते. यंदा कोरोनामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देणे शक्य होणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
लॉकडाऊनमुळे शाळा बंद असल्याने शाडू माती विद्यार्थ्यांना देता येणार नाही. यासाठी घरातील ज्वारी आणि गव्हाच्या पिठाच्या गणेश मूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण ईसीएच्या वतीने देण्यात येणार असल्याचे विकास पाटील यांनी सांगितले. कोरोनामुळे खबरदारीचा उपाय म्हणून विद्यार्थ्यांना गणेशमूर्ती घरच्या घरी कशी बनवता येईल यासाठी ईसीए ऑनलाईन प्रशिक्षण देणार आहे.
घरात उपलब्ध असलेल्या ज्वारी आणि गव्हाच्या पिठाच्या सहाय्याने गणेशमूर्ती बनवणे शक्य होणार आहे. दरवर्षी इसीएच्या वतीने प्रत्येक शाळांमध्ये प्रशिक्षण दिले जाते. यंदा कोरोनामुळे ते शक्य नाही. यासाठी संस्थेच्या वतीने व्हिडीओ बनवण्यात आला आहे. त्याची लिंक संबंधित शिक्षकांना देण्यात येणार आहे. संस्थेच्या संपर्कात शहरातील ६०० शाळा आहेत. तसेच शाळांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये हा व्हिडीओ शेअर केला जाणार आहे.