न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६. जुलै. २०२०) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मास्क खरेदीचा चौकशी अहवाल पूर्ण झाला आहे. या अहवालाने एकप्रकारे मास्क खरेदीच्या घोटाळ्यावर शिक्कामोर्तबच केला आहे. हा अहवाल आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे सोपविला आहे. दोन पुरवठादार संस्थानी निकृष्ट दर्जाचे मास्क दिल्याचा ठपका ठेवण्यात आला असून त्यांना काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे मास्क घोटाळ्याचा पर्दाफाश राष्ट्रवादी काँग्रेसनेच केला होता आणि राष्ट्रवादीच्याच माजी ३ पदाधिकाऱ्यांच्या एक जवळचीच संस्था या घोटाळ्यात अडकली आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील झोपडपट्टीसह अन्य प्रभागात करोना संसर्गाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात सुरु आहे. त्यामुळे नागरिकांना मास्क पुरवण्याचा निर्णय सत्ताधारी भाजपकडून घेण्यात आला होता. शहरात करोनाचा संसर्ग वाढत असताना महापालिकेने झोपडीपट्टीतील नागरिकांना मास्क वाटप करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी कोणतीही निविदा न मागविता, करारनामा न करता पुरवठाधारकांकडून थेट पद्धतीने मास्क खरेदी केले.
एक मास्क दहा रुपयांना खरेदी करण्यात आला. भाजप आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्याच संस्थांकडून १ कोटी ७० लाख रुपयांच्या मास्कची खरेदी करण्यात आली. राजकीय व्यक्तींनी करोनाचे भांडवल करत आपल्या मर्जीतल्या संस्थाना मास्कचा ठेका मिळवून दिला. मात्र त्या संस्थांनी निकृष्ट दर्जाचे मास्क पुरविले. त्या संस्थेचे गुरुनूर एंटरप्रायझेस असे नाव आहे. तर साई एंटरप्रायझेस असे दुसऱ्या एका संस्थेचे नाव आहे. या दोन्ही संस्थेने पुरविलेल्या मास्कचा दर्जा खराब व कापड निकृष्ट असल्याचा ठपका ठेवण्यात आलेला आहे. त्या दोन्ही संस्थांना काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्ताव भांडार विभागाकडून तयार करण्यात आल्याचे समजले आहे.