- नागरिकांची केली मोफत कोविड-१९ चाचणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७. जुलै. २०२०) :- शहरामध्ये दिवसेंदिवस करोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. करोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येमुळे नागरिक धास्तावले आहेत. नागरिकांची चिंता कमी करण्यासाठी नगरसेवक वसंत बोराटे यांनी आमदार महेश लांडगे यांच्या सहकार्यातून मोशी परिसरातील नागरिकांसाठी मोफत कोविड-१९ चाचणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. शुक्रवारी आयोजित केलेल्या या शिबिरात परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत चाचणी करून घेतली. नगरसेवक वसंत बोराटे यांनी महागडी टेस्ट मोफत उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानले.
प्रभाग क्रमांक दोन मध्ये नगरसेवक वसंत बोराटे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर मोफत कोविड-१९ तपासणी कऱण्यात आली. प्रभागातील नागरिकांनी कोविड-१९ तपासणी करण्यासाठी सकाळी १० वाजल्यापासून सुरुवात केली होती. मोशी परिसरातील अनेक सोसायट्यांमध्ये करोनाचे रूग्ण सापडत आहेत. रूग्ण सापडल्यानंतर नगरसेवक वसंत बोराटे आणि त्यांचे सहकारी त्या सोसायटीमधील नागरिकांची तपासणी आणि जनजागृतीसाठी प्रयत्न करतात. मात्र परिसरातील नागरिकांनी सर्वांचीच कोविड-१९ चाचणी करावी अशी मागणी केली होती. त्यानुसार आमदार महेश लांडगे यांच्या सहकार्यातून नगरसेवक वसंत बोराटे यांनी हे शिबिर घेतले.
पिंपरी-चिंचवड महापालिका व रूबी केअरच्या मार्फत ही तपासणी करून घेतली. या तपासणी शिबिरासाठी डॉ. भावसार आणि त्यांच्या टीमचे सहकार्य लाभले. खासगी लॅबमध्ये या चाचणीसाठी ३ ते ४ हजार रूपये घेतले जातात. गोरगरीबांच्या खिशाला न परवडणारे हे शुल्क असल्यामुळे अनेक नागरिक लक्षण असूनही तपासणी करून घेत नाहीत. त्यामुळे प्रभागातील रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती. दहा दिवसांच्या य़ा लॉकडाऊनमध्ये प्रभागातील नागरिकांची तपासणी करून उपचार करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे नगरसेवक वसंत बोराटे यांनी सांगितले.
नगरसेवक बोराटे म्हणाले, अनेक केसेसमध्ये कोरोनाची लक्षणेही आढळून आलेली नाहीत. त्यामुळे नागरिकांची कोविड १९ चाचणी करणे अत्यंत आवश्यक होते. नागरिकांच्या मागणीनंतर आमदार महेश लांडगे यांच्याशी चर्चा करून त्यांच्या सहकार्याने हे चाचणी शिबिर घेतले आहे. ‘माझा प्रभाग माझी जबाबदारी’ या संकल्पनेतून नगरसेवक बोराटे यांचे प्रभागातील नागरिकांसाठी कार्य सुरु आहे.















