- पुणे जिल्ह्यात तात्काळ तीन जम्बो रुग्णालयांची उभारणी…
- शासकीय व खाजगी वैद्यकीय महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना पाचारण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७. जुलै. २०२०) :- कोरोना विषाणूचा फैलाव दिवसेंदिवस राज्यासह पुणे, पिंपरी चिंचवड शहर व ग्रामीण भागात प्रचंड वेगाने वाढतो आहे. कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार, प्रशासन, वैद्यकीय यंत्रणा आपआपल्या परीने सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्याच धर्तीवर पुणे जिल्ह्यात तात्काळ तीन जम्बो रुग्णालयांच्या निर्मितीचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. तसेच येत्या पंधरा दिवसांत तातडीने बेडची संख्या वाढविण्याचे आदेशही दिले. परंतु, बेडची संख्या वाढली तरी आरोग्य कर्मचारी, डॉक्टर कोठून आणणार असा प्रश्न उपस्थित झाला.
यावर तातडीने उपाय म्हणून सर्व शासकीय व खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या एमबीबीएस, पीजीच्या व नर्सिंगच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना त्वरीत ड्युटीवर बोलावून ही मनुष्यबळाची कमतरता भरून काढण्याचे आदेश पवार यांनी बैठकीत दिले.
विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना विषाणू प्रादुर्भाव निर्मुलन आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. बैठकीला महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, विभागीय आयुक्त कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी सौरभ राव, जमाबंदी आयुक्त एस.चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, खासगी रुग्णालयांवर नियंत्रण ठेवा खासगी दवाखान्यातून कोरोना उपचाराची मोठ्या रक्कमांची बिले आकारली जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. खासगी रुग्णालयाचे बिल स्वतंत्र लेखा परीक्षकांच्या माध्यमातून तपासली जातील. शासनाच्या नियमानुसार उपचारांची दर आकारणी केली आहे का, याची शहानिशा करूनच रुग्णाला बिल दिले जावे, याबाबत सबंधित यंत्रणेने दक्षता घेण्याच्या स्पष्ट सूचनाही पवार यांनी दिल्या.