न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८. जुलै. २०२०) :- दोन दिवसांपासून यशवंतराव चव्हाण मेमोरियल रुग्णालयामध्ये घडत असलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय अधिकारी यांनी जे धरणे आंदोलन केले होते, त्यावर महापौर माई ढोरे, पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, उपमहापौर तुषार हिंगे, चिंचवड विधानसभा मतदार संघाचे आमदार लक्ष्मण जगताप व भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेशदादा लांडगे यांनी प्रशासनाच्या अधिका – यांचे उपस्थितीत संबंधीत वैद्यकीय अधिकारी यांचेशी चर्चा करुन आंदोलनापासून परावृत्त केले.
सदर बैठकीत यशवंतराव चव्हाण मेमोरियल रुग्णालयामध्ये सुरक्षा व्यवस्था वाढविण्याबाबत पोलिसांना तसेच महानगरपालिकेच्या सुरक्षा विभागास निर्देश देण्यात आले. तसेच ज्या सन्माननीयांनी, नागरिकांनी शासकीय कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला, त्यांचे विरुध्द गुन्हा दाखल करण्याच्या देखील सूचना देण्यात आल्या.
त्यासोबत विविध वैद्यकीय अधिकारी यांच्या कोवीड -१९ च्या पार्श्वभूमीवर वेतन व इतर अडीअडचणींबाबत सकारात्मक चर्चा होवून वेतनवाढ स्थायी समितीने मंजूर करण्यात आल्याचे सांगण्यात आले. कोवीडग्रस्त नागरिकांना अधिकाधिक जास्त सुविधा यशवंतराव चव्हाण मेमोरियल रुग्णालयात मिळाव्यात, याकरिता डॉक्टरांच्या संख्येत तसेच नर्स, वॉर्डबॉईज यांच्या संख्येत वाढ करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, ३० अतिरिक्त आयसीयु बेड व हाय डिपेंडन्सी युनिट लवकरात लवकर तयार करण्याच्या सूचना अधिष्ठाता यांना देण्यात आल्या. रुग्णांचे नातेवाईक यांना रुग्णाच्या स्थितीची माहिती देण्याकरीता यशवंतराव चव्हाण मेमोरियल रुग्णालयामध्ये कॉल सेंटर स्थापन करण्यात येईल, अशा सूचना महापौर माई ढोरे यांनी केली. प्लाझ्मा डोनर्स यांनी देखील पुढे येवून रुग्णांना प्लाझ्मा दान करावे, असेही आवाहन या निमित्ताने करण्यात आले.
बैठकीस आयुक्त श्रावण हर्डीकर, अपर आयुक्त संतोष पाटील, अधिष्ठाता डॉ. राजेंद्र बाबळे, डॉ. पवन साळवे व इतर वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.