- आर्ट ऑफ लिव्हिंग आणि सामाजिक कार्यकर्ते संतोष बारणेंच्या पुढाकाराने भंडारा डोंगरावर १०८ झाडांचे वृक्षारोपण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९. जुलै. २०२०) :- एका रात्रीत एखादा माणूस निसर्गाची विस्कटलेली घडी ठीक करू शकत नाही. पण प्रत्येकाने आपापला खारीचा वाटा ओळखून कार्यास सुरुवात केली की, काही काळाने त्याचा एकत्रित परिणाम निश्चितपणे दिसून येतो. असाच एक प्रयत्न मोशीतील ग्रामस्थ तथा सामाजिक कार्यकर्ते संतोष बारणे हे गेली सात-आठ वर्षे करीत आहेत. एक म्हणजे वृक्ष लावणे व दुसरा म्हणजे लावलेला वृक्ष जगवणे. या संकल्पनेतूनच बारणे यांनी नुकतेच आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या सहकार्याने तुकोबांचे साधनास्थळ असणाऱ्या तीर्थक्षेत्र भंडारा डोंगरावर ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ या ओवीचा आदर्श घेऊन, वृक्षवल्ली पुन्हा फुलविण्यासाठी १०८ देशी झाडांचे वृक्षारोपण केले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते संतोष बारणे, पिंपरी चिंचवडच्या आर्ट ऑफ लिव्हिंगचे शिक्षक तुषार आल्हाट, प्रतिनिधी व परिसरातील वृक्षप्रेमी उपस्थित होते.

बारणे म्हणाले की, ‘संत तुकारामांचा काळ हा निसर्गाच्या सान्निध्यात भरपूर वनश्री असणा-या, जवळपास चारशे वर्षापूर्वीचा काळ होता. निसर्गाला आजच्याइतका ओढग्रस्तीचा काळ नव्हता. तरीही आपले संत निसर्गाप्रती आपला कृतज्ञभाव व्यक्त करतात. पण आजच्या काळात आपण वैयक्तिक स्वार्थासाठी सर्वत्र निसर्गाचा हा-स करत चाललो आहोत. त्याची आपल्याला ना खंत ना खेद. वरून परमेश्वराला दोष द्यायला आपण मोकळे. दुस-याकडे बोट दाखवल्याने आपली जबाबदारी कमी होत नाही, तर त्यावर उपाय शोधणे व तो अमलात आणणे हे आपले कर्तव्य ठरते. केवळ वृक्षारोपण करून आपले कर्तव्य संपत नाही तर, लावलेले झाड व्यवस्थितरीत्या वाढवणेदेखील महत्त्वाचे आहे. याच संकल्पनेतून तुकोबांच्या भंडारा डोंगरावर वृक्षारोपण केले. झाडांना संरक्षक जाळ्या बसविण्यात आल्या. जोपर्यंत लावलेल्या झाडाची योग्य वाढ होत नाही, तोपर्यंत त्याची निगाही राखण्यात येणार आहे. पुढे आणखी १००८ झाडांचे वृक्षारोपण करण्याचा आमचा संकल्प आहे. तरच निसर्गाचा समतोल राखला जाईल’.
आर्ट ऑफ लिव्हिंगचे तुषार आल्हाट म्हणाले की, झपाटय़ाने बदलत जाणा-या जागतिक तापमानाचे दूरगामी परिणाम निसर्गावर व पर्यायाने मानवावर होत आहेत. उद्या परिस्थिती याहूनही भीषण असू शकते. तेव्हा आपण त्यास सज्ज असले पाहिजे. शहरातील सिमेंटच्या जंगलात राहूनही माणसाने आयुष्यात एक तरी झाड लावावे व त्याचे संगोपन करावे. या समस्येवर हिरवळीशिवाय पर्याय नाही.


















