न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६. ऑगस्ट. २०२०) :- अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील नोंदणीचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला असून विद्यार्थ्यांना आता नियमित पहिल्या प्रवेश फेरीच्या गुणवत्ता यादीची येत्या रविवारपर्यंत (ता. ३०) प्रतिक्षा करावी लागणार आहे.
पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील ३०४ कनिष्ठ महाविद्यालयांतील १ लाख ६ हजार ९७२ जागासाठी आनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. दिलेल्या मुदतीमध्ये आलेल्या ७२ हजार ८२० विद्यार्थ्याची सर्वसाधारण गुणवत्ता यादी शिक्षण विभागातर्फ प्रसिध्द करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना सर्वसाधारण गुणवत्ता यादीवर आक्षेप नोंदवण्यासाठी कालावधी देण्यात आला होता.
दरम्यान, प्रवेश प्रक्रियेत जवळपास सहा हजार १९० विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले आहे. तर, ६३ विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश रद्द केले आहेत. अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत सहभागी झालेल्या दोन हजार ११७ विद्यार्थ्यांनी तात्पुरत्या गुणवत्ता यादीवर आक्षेप नोंदविले आहेत. यामध्ये पाच प्रकारात वर्गीकरण करण्यात आले असून, त्या अंतर्गत तांत्रिक एक हजार १०१, गुणवत्ता यादी १२८, अतिरिक्त ३, प्रशासकीय ३९ आणि इतर ८१३ असे आक्षेप आहेत.
शिक्षण विभागाने दिलेल्या वेळापत्रकानुसार येत्या रविवारी (ता. ३०) नियमित प्रवेश फेरी अंतर्गत प्रवेशासाठी गुणवत्ता यादी प्रसिध्द केली जाणार आहे. त्यात त्याच्या लोग इनमध्ये प्रवेशासाठी मिळालेले महाविद्यालय दर्शविले जाईल. त्याचप्रमाणे प्रवेशाबाबत मोबाईल संदेश पाठविण्यात येणार आहे. तसेच पहिल्या नियमित फेरीचे कट ऑफ संकेतस्थळावर प्रसिध्द केले होणार असून संबंधित कनिष्ठ महाविद्यालयाला प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची यादी त्यांच्या लॉगइनमध्ये पाठवली जाईल, असे अकरावी ऑनलाइन प्रवेश नियंत्रण समितीच्या सचिव शेंडकर यांनी सांगितले.















