न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६. ऑगस्ट. २०२०) :- पिंपरी – चिंचवड शहर पोलीस दलात आतापर्यंत २६९ जण कोरोना पॉझिटिव्ह असून, त्यातील २१४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. ५५ पोलिसांवर उपचार सुरू आहेत.
शहर पोलीस दलाच्या कोरोना सेलतर्फे प्रत्यक रुग्णाचे मनोधैर्य उंचावण्यात येत आहे. त्यामुळे पोलीस कोरोनाला हरवत असून, सुदैवाने शहरातील एकही पोलीस कोरोनामुळे दगावलला नाही. उपचार पद्धतीमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना रुग्णालयात बेड उपलब्ध करून देणे, लक्षणे असलेले व नसलेले, तसेच गंभीर व अतिगंभीर, पूर्वीचे आजार असलेले व नसलेले अशी वर्गवारी करण्यावर भर दिला. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार दिले.
अति गंभीर रुग्णांसाठी देशभरातून औषधे उपलब्ध करून दिली. प्लाझ्मा आदी थेरपीचा वापर होत आहे. समन्वय व संपर्क राखत कोरोना सेलकडून पॉझिटिव्ह रुग्णांशी फोनवरून चर्चा केली जाते. त्यांची विचारपूस करून त्यांचे मनोबल वाढविले जाते. त्यासाठी व्हिडीओ कॉलवरून थेट संवाद साधला जातो. त्यामुळे संबंधित रुग्णाला एकाकीपण जाणवत नाही. तसेच वरिष्ठ अधिका-यांनी भावनिक संवाद साधल्याने त्यांचे मनोधैर्य उंचावते. यासाठी कोरोना सेलमधील प्रत्येक जण सातत्याने प्रयत्न करीत आहे.















