- पोलीस आयुक्त व सहाय्यक पोलिस आयुक्तांची बदली मागणारेच कायद्याचे भक्षक…
- माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांचा आरोप…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९. ऑगस्ट. २०२०) :- मागील विधानसभा निवडणूकीत पिंपरीमध्ये दोन गटात भांडणे झाली होती. त्यावेळी परस्पर विरोधी गुन्हे पिंपरी पोलिस ठाण्यात दाखल झाले होते. याचा तपास पिंपरी पोलिसांकडून काढून सीआयडीकडे द्यावा. तसेच पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई व सहाय्यक पोलिस आयुक्त श्रीधर जाधव यांची बदली करावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे पालिकेचे माजी उपमहापौर व ज्येष्ठ नगरसेवक हिरानंद उर्फ डब्बू आसवानी यांनी केली आहे.
या मागणीच्या विरोधात पिंपरी विधानसभेचे माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांनी आज शनिवारी (दि. २९) पत्रकार परिषद घेऊन आसवानी यांच्या आरोपांचे खंडन केले आहे व या चोराच्या उलट्या बोंबा असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
आमदार चाबुकस्वार यांनी सांगितले की, पिंपरी विधानसभेच्या निवडणूकीमध्ये डब्बु आसवानी आणि आसवानी बंधूंनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ला करून जखमी केले. याबाबत पोलीसांनी कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल केले. याचा राग मनात ठेवून पिंपरी पोलीस आणि पोलीस आयुक्त बिश्नोई व सहाय्यक पोलिस आयुक्त श्रीधर जाधव यांच्यावर बेछूट भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत.
खऱ्या अर्थाने डब्बु आसवानी आणि गुंड आसवानी परिवार यांनी पिंपरी कॅम्प मध्ये माफीया राज्य चालविले आहे. या आसवानी गुंड परिवारावर एकूण ७० गुन्हे दाखल होऊनसुद्धा त्यांच्यावर कारवाई होत नाही. पैशाचाच्या जोरावर कायदा आणि सुव्यवस्था याची वाट लावली जात आहे. खऱ्या अर्थाने या परिवाराला महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायदयाखाली अटक करावी, त्यामुळे पिंपरी कॅम्पमध्ये शांतता प्रस्थापित होईल व गुंडगिरी थांबली जाईल.














