न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ सप्टेंबर. २०२०) :- जागा घेण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ केला. याप्रकरणी पोलीस शिपाई असलेल्या पतीसह सासू, सासरे, दीर आणि दोन नणंदांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. कुर्ला पोलीस लाईन, कुर्ला आणि घाटकोपर मुंबई येथील चिरागनगर पोलीस लाईन येथे २९ डिसेंबर २००८ ते ३० नोव्हेंबर २०१९ या कालावधीत हा प्रकार घडला.
विवाहितेने याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात ३१ ऑगस्ट २०२० रोजी फिर्याद दिली. पती राहुल महादेव सोनकांबळे (वय ३४), सासू सुमन महादेव सोनकांबळे, सासरे महादेव सोनकांबळे, अमोल महादेव सोनकांबळे (चौघे रा. घाटकोपर, मुंबई), नणंद धम्मशीला धनाजी माने (रा. थेरगाव), वनमाला लक्ष्मण ससाणे (रा. थेरगाव) अशी आरोपींची नावे आहेत.
फिर्यादी यांचा पती आणि दीर हे दोघेही पोलीस दलात कार्यरत आहेत. जागा घेण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत आरोपी यांनी फिर्यादी यांना त्रास दिला. तसेच फिर्यादी यांच्या आई – वडिलांना शिवीगाळ केली. विविध कारणांवरून टोमणे मारुन मानसिक छळ केला.