न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ सप्टेंबर २०२०) :- पिंपरी चिंचवड महापालिका सेवेतील व सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी एक सप्टेंबर २०१५ पासून धन्वंतरी स्वास्थ्य योजना सुरू आहे. पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी अचानक १४ सप्टेंबर २०२० पासून रात्री १२ नंतर ही योजना स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
पिंपरी-चिंचवड पालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे आणि सरचिटणीस सुप्रिया सुरगुडे यांच्या नेतृत्वाखाली कर्मचारी आज मंगळवारी पालिका प्रवेशद्वारावर काळ्या फिती बांधून दिवसभर काम करीत आयुक्तांच्या कृतीचा निषेध करणार आहेत.
सर्व पॅनेलवरील रुग्णांलयांनी याची नोंद घेवून १५ सप्टेंबरच्या पहाटे एक नंतर धन्वंतरी योजनेतील कोणत्याही सभासदांना या योजनेअंतर्गत उपचाराकरिता दाखल करून घेवू नये असे आयुक्त हर्डीकर यांनी आदेशात म्हटले आहे. आयुक्तांच्या निर्णयाला कर्मचारी महासंघाने तीव्र विरोध केला आहे. कोरोनाच्या महामारीत ‘धन्वंतरी स्वास्थ’ ही वैद्यकीय योजना कर्मचाऱ्यांसाठी लाभदायक ठरत होती. प्रशासनाने योजना बंद करणे अतिशय चुकीचे आहे. आयुक्तांनी हा निर्णय मागे घ्यावा. अन्यथा आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे यांनी दिला आहे.