न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ सप्टेंबर २०२०) :- पिंपरी – चिंचवड महापालिका शाळेतील दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना १ लाख ते २५ हजार रुपयांचे बक्षीस दरवर्षी दिले जाते. यंदाच्या वर्षी एकूण २६२ विद्यार्थी या बक्षिसासाठी पात्र ठरले असून, त्यासाठी एकूण १ कोटी ५ लाख २५ हजार रुपयांच्या रकमेचे वितरण त्यांच्या बँक खात्यावर थेट ‘ ईसीएस’द्वारे केले जाणार आहे.
दहावीच्या परीक्षेत ८० टक्केपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना पालिकेतर्फे प्रोत्साहनपर बक्षीस रक्कम दिली जाते. दहावीचा निकाल २९ जुलैला इंटरनेटवर प्रसिद्ध झाला. त्यात ९० टक्केपेक्षा अधिक गुण मिळविणारे २० विद्यार्थी आहेत. त्यांना प्रत्येकी १ लाखाप्रमाणे एकूण २० लाख रूपये दिले जाणार आहेत. ८५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणारे ९० विद्यार्थी असून, त्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांप्रमाणे एकूण ४५ लाख रुपये वितरित केले जाणार आहेत.
८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविलेले तब्बल १४३ विद्यार्थी आहेत. त्यांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचे बक्षीस आहे. ती एकूण ३५ लाख ७५ हजारांची रक्कम आहे. दिव्यांग गुणवंत विद्यार्थी २९९ असून, त्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. एकूण रक्कम ४ लाख ५० हजार आहे. एकूण १ कोटी ५ लाख २५ हजार रुपये बक्षीस म्हणून दिले जाणार आहेत. ही रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात थेट ‘ ईसीएस’द्वारे जमा केली जाणार आहे. मात्र, दोन विद्यार्थ्यांचे बँक खाते नसल्याने त्यांना धनादेश दिला जाणार आहे. बक्षीस रकमेसाठी अर्थसंकल्पात केवळ ७० लाखांची तरतूद आहे. ‘ विविध उपक्रम ‘ लेखाशीर्षावर असलेली ४० लाखांची रक्कम गुणवंत विद्यार्थी सत्कार ‘ या लेखाशीर्षावर वर्ग करून ही रक्कम अदा केली जाणार आहे.














