न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ सप्टेंबर २०२०) :- प्राधिकरणातील जुन्या पिढीतील अध्यापक, कार्यकारी दंडाधिकारी, ह.भ.प.कै. वसंतराव पाटील यांच्या पहिल्या स्मृती दिनानिमित्त (२१ सप्टेंबर) निगडी येथील “अमरधाम स्मशान भूमी” येथे देशी झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. त्याचप्रमाणे निगडीतील यमुनानगर पोलीस चौकी येथे पोलीस अधिकारी कर्मचारी यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र बाबर, निगडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक वर्षाराणी घाटे, प्रकाश लोखंडे, समितीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष विजय पाटील, संपर्क प्रमुख विजय मुनोत, आकुर्डी गंगानगर विभाग अध्यक्ष संतोष चव्हाण हे प्रमुख उपस्थित होते.
या प्रसंगी अमरधाम स्मशान भूमी येथे वड, पिंपळ, फणस या देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. तसेच मार्च २०२० पासून “कोविड १९”च्या महामारी काळात जीवाची पर्वा न करता सतत कार्यरत असणारे स्वच्छता व आरोग्य दूत कर्मचारी बाळू भंडारे, संदीप करंडे, दत्तात्रय हटकर, शिवानंद माशाळकर, जाकीर शेख, रोहित सोनवणे, बाळू भोर, अरविंद भोसले, मनोज गडकरी, राजू चाचा, अनिल सोनकांबळे, भाऊराव उज्जेनकर यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी पोलीस उपनिरीक्षक वर्षाराणी घाटे म्हणाल्या, ” नागरी सेवा बजावत असताना आमच्या विभागातील अनेक पोलीस अधिकारी, कर्मचारी हे कोविड १९ ने बाधित झाले परंतु उपचार घेऊन ते पुन्हा या कोविड युद्धात तत्परतेने हजर झाले.आमच्या सेवा कार्याची सामाजिक संघटना दखल घेतात तेव्हा नक्किच प्रेरणा व स्फूर्ती मिळते.”
समिती अध्यक्ष विजय पाटील म्हणाले,” ह.भ.प.कै वसंतराव पाटील यांनी ५० वर्षांपेक्षा जास्त काळ समाज सेवेचे व्रत पूर्ण केले, अनेक कामगारांना त्या काळात त्यांचा हक्क प्रदान करण्यासाठी लढा दिला.आकुर्डी येथील म्हाळसाकांत विद्यालयात अध्यापक म्हणून शिक्षणसेवा दिली. संत साहित्याचा गाढा अभ्यास करून समाजास मोलाचे मार्गदर्शन केले. आज त्यांच्या पहिल्या स्मृतिदिनी कोविड १९ म्हणजेच कोरोना महामारीत अखंड सेवा करत असणाऱ्या दूतांचा सन्मान करताना नक्कीच आनंद होत आहे.”
समाजिक कार्यकर्ते राजेंद्र बाबर म्हणाले,” गेल्या अनेक वर्षांपासून अमरधाम स्मशान भूमीतील कर्मचारी हे अखंड सेवा देत आहेत.कोविड काळात जोखमीच्या परस्थितीतही हे “जवान” जनहितासाठी कार्यरत आहेत.त्यांचे कार्य नक्कीच अतुलनीय आहे. ह.भ.प. कै. वसंतराव पाटील यांच्या सेवा आदर्शाचे पालन नक्कीच ते करीत आहेत.”
विभागीय अध्यक्ष संतोष चव्हाण म्हणाले,” निगडी परिसरातील पोलीस कर्मचारी हे कोरोना काळातही नागरिकांच्या समस्या निवारण करण्याकरिता सतत रस्त्यावर सेवा बजावताना दिसून येत आहेत. पोलीस कर्मचारी हे अनेक अडचणींचा सामना करत नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी मास्क ची जनजागृती व सोशल डिस्टन्स बाबत प्रबोधन करीत आहेत.”
संपर्क प्रमुख विजय मुनोत यांनी प्रास्ताविक व आभार प्रदर्शन केले.