न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ सप्टेंबर २०२०) :- पादचाऱ्याकडील मोबाईल पळविणाऱ्या दोन दुचाकीस्वारांना ‘ जेरबंद करण्यात आले आहे. त्यांच्याकडून एक लाख ३० हजार रुपयांचा मोबाइल तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली. खंडणी दरोडा विरोधी पथकाने मॅक्झिन चौक, दिघी येथे रविवारी (दि. २०) सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास ही कारवाई केली.
हिमांशू योगेश सोळंकी (वय २०), प्रज्वल संजय जाये (वय २०, दोघे रा. दिघी), असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. खंडणी दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत यांनी दिलेल्या माहितीनुसार, टॉप २५ फरारी आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक गस्त घालत होते. त्यावेळी आरोपी हे एका दुचाकीवर दिघीतील मॅक्झिन चौक येथे थांबले असून, त्यांच्याजवळ चोरीचा मोबाइल आहे, अशी माहिती पोलीस कर्मचारी किरण काटकर व नितीन लोखंडे यांना मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. आरोपी सोळंकी याच्याकडे एक मोबाइल मिळून आला. आरोपी जांबे याच्यासह दुचाकीवरून जाऊन इंद्रायणीनगर, भोसरी येथून एका पादचाऱ्याच्या हातातून तो मोबाइल हिसकावून घेतला असल्याचे आरोपी सोळंकी याने पोलिसांना सांगितले. त्याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. आरोपी यांच्याकडून एक लाख ३० हजारांचा मोबाइल, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी पोलिसांनी जप्त केली.