न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ सप्टेंबर २०२०) :- मध्यमवर्गीयांच्या घरकुलाचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी म्हाडा पुणे शहर आणि पिंपरी – चिंचवड शहरातील तब्बल साडेतीन हजार घरांसाठी लवकरच सोडत जाहीर करणार असल्याची माहिती पुणे म्हाडाचे मुख्याधिकारी नितीन माने पाटील यांनी दिली.
राज्य शासनाने डिसेंबर २०२० अखेरपर्यंत स्टॅम्प ड्यूटीमध्ये सवलत जाहीर केली असून, म्हाडाच्या लाभार्थ्यांना या सवलतीचा लाभ मिळावा, यासाठी सोडत जाहीर करण्यात येणार आहे. खासगी विकसकाकडून म्हाडाला जी २० टक्के घरे मिळाली आहेत, त्या घरांची किंमत निश्चित करण्याचे काम सुरू आहे. तसेच म्हाडाच्या स्वतःच्या जागेवरदेखील मोठ्या प्रमाणात घरे बांधण्यात येणार आहेत. त्यामुळे काम पूर्ण होताच जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
म्हाडाच्या वतीने लोकांना परवडणाऱ्या किमतीत घरे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. त्यात लाभार्थ्यांना स्टॅम्पड्यूटीचा लाभ मिळाल्यास आणखी एक-दीड लाख रुपयांचा फायदा होऊ शकतो. यासाठी येत्या काही दिवसांत पुण्यात साडेतीन हजार घरांची सोडत काढण्यात येणार आहे. सध्या घर खरेदी करणे सामान्य माणसाला परवडणारे नाही. मात्र म्हाडा सर्वसामान्यांना घर उपलब्ध करून देण्यास कटिबद्ध आहे.