न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ सप्टेंबर २०२०) :- थेरगाव येथे एका अल्पवयीन चोरट्यास त्याच्या साथीदारासह जेरबंद करण्यात आले. त्यांच्याकडून चोरीच्या १० दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. वाकड पोलिसांनी ही कारवाई केली. प्रकाश हरिदास पाटील (२३, रा. पाण्याचे टाकीजवळ, कैलासनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, तपास पथक हद्दीत गस्त घालत असताना पोलिस कर्मचारी बापुसाहेब धुमाळ यांना माहिती मिळाली की, वाकड पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील सराईत अल्पवयीन चोरटा हा त्याच्या साथीदारासह थेरगाव येथे थांबलेला आहे. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून जेरबंद केले. अल्पवयीन चोरटा हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या ताब्यातून तीन लाख रुपये किमतीच्या १० दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
या कामगिरीमुळे भोसरी पोलीस ठाण्यातील एक घरफोडीचा गुन्हा उघडकीस आला आहे. तसेच वाकड, पिंपरी, हिंजवडी, भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यातील वाहनचोरीचे गुन्हे असे सहा गुन्हे उघडकीस आले आहेत. उर्वरित पाच वाहनांबाबत तपास सुरू आहे.