- शिरवळजवळ टाटा नेक्सॉनचा भीषण अपघात..
- अवघ्या विशीतील मुलांच्या मृत्यूनं मावळ आणि तळेगाव परिसरावर शोककळा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
सातारा/पिंपरी चिंचवड (दि. ११ ऑगस्ट २०२६) :- महाबळेश्वरला पिकनिकसाठी निघालेल्या सहा तरुणांच्या प्रवासाचा शिरवळजवळ झालेल्या भीषण अपघाताने दुर्दैवी अंत झाला. पुणे-सातारा महामार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास टाटा नेक्सॉन कारचा ताबा सुटून ती डिव्हायडर ओलांडत विरुद्ध दिशेने येणाऱ्या आयशर ट्रकवर आदळली. या भीषण धडकेत कारमधील चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले.
मृतांमध्ये वेदांत अर्जुन वारिंगे (१९), सोनलिंग धीरेंद्र ठाकूर (१९), आदित्य बाळासाहेब गरुड (१९) आणि निखिल बाळू राऊत (२०) यांचा समावेश आहे. तर दीक्षित दयानंद पुजारी (२०) आणि मयूर हनुमंत शिंदे (२०) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सहाही मित्र टाटा नेक्सॉन कारमधून पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने महाबळेश्वरला जात होते. रात्री सुमारे एक वाजण्याच्या सुमारास त्यांची कार शिरवळ परिसरात आली असता चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. कार प्रथम डिव्हायडरला धडकली आणि त्यानंतर विरुद्ध दिशेच्या मार्गावर जाऊन समोरून येणाऱ्या आयशर ट्रकवर जोरदार आदळली.
अपघाताची तीव्रता एवढी होती की कारचा मोठ्या प्रमाणात चक्काचूर झाला. घटनेची माहिती मिळताच सारोळा येथील महामार्ग पोलीस मदत केंद्राचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने मदतकार्य सुरू करून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या साहाय्याने बाजूला करण्यात आली.
दरम्यान, अवघ्या १९ ते २० वर्षांच्या चार तरुणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाल्याने मावळ आणि तळेगाव दाभाडे परिसरावर शोककळा पसरली आहे. पिकनिकचा आनंद घेण्यासाठी घराबाहेर पडलेल्या मित्रांच्या प्रवासाचा असा दुर्दैवी शेवट झाल्याने कुटुंबीय आणि मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या अपघाताचा पुढील तपास महामार्ग पोलीस करत आहेत.


















