- सार्वजनिक शिस्तीचा प्रश्न ऐरणीवर..
- देहूरोड, दिघी पोलिसांची महिलांवर कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ११ ऑगस्ट २०२६) :-पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव व आक्षेपार्ह शब्दांचा वापर करून नागरिकांना त्रास देण्याचे प्रकार समोर आले आहेत. किवळे येथील जुना बेंगळुरू-मुंबई महामार्ग परिसरात तसेच दिघीतील मॅगझीन चौक परिसरात अशा प्रकारच्या तीन स्वतंत्र घटना घडल्या. या प्रकरणी देहूरोड आणि दिघी पोलिसांनी संबंधित महिलांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
किवळे येथे १० ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास जुना बेंगळुरू-मुंबई महामार्गावरील इमारतीसमोरील सर्व्हिस रोडवर एक महिला सार्वजनिक ठिकाणी ये-जा करणाऱ्या नागरिकांना उद्देशून अश्लील हावभाव करत असल्याचे पोलिसांच्या तक्रारीत नमूद आहे. संबंधित महिलेने वेश्याव्यवसायाच्या उद्देशाने शब्द उच्चारून डोळ्यांनी खुणा व हाताने लैंगिक हावभाव केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी महिलेवर कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, दिघी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मॅगझीन चौक परिसरात एकाच दिवशी अशाच प्रकारच्या दोन घटना समोर आल्या. १० ऑगस्ट रोजी रात्री सव्वाआठच्या सुमारास भोसरीकडून मॅगझीन चौकाकडे येणाऱ्या रस्त्याच्या कडेला ४४ वर्षीय महिला अश्लील हावभाव व आक्षेपार्ह शब्द वापरत असल्याचे पोलिसांच्या तक्रारीत नमूद आहे. तसेच, ये-जा करणाऱ्या नागरिकांना अडथळा निर्माण होईल आणि सार्वजनिक सभ्यतेचा भंग होईल, असे कृत्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याच परिसरात रात्री साडेआठच्या सुमारास आणखी एक घटना घडली. ३७ वर्षीय महिलेने मॅगझीन चौक परिसरात अश्लील हावभाव व शब्दांचा वापर करून ये-जा करणाऱ्या नागरिकांना अडथळा निर्माण केल्याचा आरोप आहे. तिच्याविरुद्ध दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनांमुळे सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे नागरिकांना त्रास देणाऱ्यांवर पोलिसांनी अधिक कठोर कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे. विशेषतः गर्दीच्या रस्त्यांलगत आणि चौक परिसरात अशा प्रकारांमुळे सार्वजनिक शिस्त, वाहतुकीला होणारा अडथळा आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे चित्र आहे. तिन्ही प्रकरणांचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.


















