- बार्सिलोना दौ-यात आलेल्या ‘व्हिजन’चा उपयोग शहरवासियांच्या प्रश्नांसाठी करावा.
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 4 डिसें) :- बार्सिलोना दौ-याबाबत पत्रकार परिषदेत खुलासा करण्यासाठी महापौर, पक्षनेते, विरोधी पक्षनेते, गटनेते आणि आयुक्तांची झालेली एकजूट भविष्यकाळात कायम टिकावी आणि पिंपरी चिंचवड शहरवासियांना भेडसावणारे सर्व प्रश्न सुटावेत अशी अपेक्षा पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष सचिन साठे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे व्यक्त केली आहे.
‘स्मार्ट सिटी एक्स्पो वर्ल्ड कॉंग्रेस 2018 ’च्या परिषदेहून आल्यानंतर महापौर, पक्षनेते, विरोधी पक्षनेते, मनसे गटनेते आणि आयुक्तांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन या दौ-याबाबत झालेल्या टिकेला उत्तर देण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. यावेळी आयुक्तांनी जगातील विविध स्मार्ट शहरांमधील विकास प्रकल्पांची दिलेली माहिती म्हणजे ‘मुंगेरीलाल के सपने’ ठरु नये.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच महापौर, आयुक्तांबरोबर विरोधी पक्षनेत्यासह गटनेते देखील परदेश दौ-यात सहभागी झाले होते. महानगरपालिकेच्या खर्चाने होणारे असले खर्चिक परदेश दौरे म्हणजे नागरिकांच्या पैशावर टाकलेला सामुहिक दरोडाच आहे. या दौ-यातून काय निष्पन्न झाले याचा सविस्तर अहवाल महापौर, विरोधी पक्षनेते, सहभागी गटनेते, आयुक्त व संबंधित अधिका-यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन जनतेसमोर मांडावा अशी मागणी साठे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केली होती.
महानगरपालिकेचे एकविस लाख रुपये खर्च करुन बार्सिलोना येथे आयोजित परिषदेत महापौर राहुल जाधव, विरोधी पक्षनेते दत्ता साने, पक्षनेते एकनाथ पवार, गटनेते सचिन चिखले, प्रमोद कुटे, सहशहर अभियंता राजन पाटील, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण यांच्यासह दहा प्रतिनिधींचे शिष्टमंडळ गेले होते.
महापालिकेत भाजपची सत्ता आल्यापासून अवघ्या दिड वर्षात पदाधिकारी व अधिका-यांनी मनपाच्या खर्चाने देश परदेशात सोळा दौरे केले आहेत. त्यापैकी एकाही दौ-याचा अहवाल अद्यापही सादर केला नाही. कॉंग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष साठे यांनी बार्सिलोना दौ-याचा अहवाल सादर करावा अशी मागणी केली होती. यानंतर पक्षनेत्यांनी मनपा पदाधिकारी व अधिका-यांना ‘व्हिजन’ आले आहे अशीही विशेष माहिती पत्रकार परिषदेत दिली. आता या व्हिजनचा उपयोग शास्तीकर, रेडझोन, अनधिकृत बांधकाम, सार्वजनिक वाहतूक खोळंबा, बीआरटी, रिंगरोड, सार्वजनिक आरोग्य, कायदा सुव्यवस्था, बेरोजगारी, शहरातील नदी नाल्यांचे प्रदुषण असे गंभिर प्रश्न सोडविण्यासाठी करावा, अशीही अपेक्षा पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष सचिन साठे यांनी व्यक्त केली आहे.












