न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ डिसें.) :- राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते व उद्योजक अमित गोरखे यांच्या पुढाकाराने अहमदनगर जिल्हा मित्र मंडळाची सोमवार (दि. ३) रोजी निगडीतील नॉव्हेल संस्थेच्या प्रांगणात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना अमित गोरखे म्हणाले की, नगर जिल्ह्यातील प्रस्थापित बांधव विविध कारणांमुळे विस्थापित झालेले आहेत. त्यांनी आपल्या कलागुणांमुळे विविध क्षेत्रात आपले व आपल्या नगर जिल्ह्याचे नाव मोठे केले आहे. परंतु, आपल्या नगर जिल्ह्यातील अनेक बांधवाच्या एकजुटीअभावी आपल्याकडे शहरवासीय व सत्ताधाऱ्यांचे नेहमीच दुर्लक्ष झालेले आहे. पिंपरी चिंचवड शहरात वास्तव्यास आलेले सातारा, सांगली, कोल्हापूर तसेच मराठवाड्यातील अनेक बांधव एकत्र आले व शासनाकडून त्यांनी अनेक सवलती मिळवल्या. त्यांच्यासाठी शासनामार्फत ५ एकर जागा मिळवून प्राधिकरणात भव्य सामाजिक व शैक्षणिक संकुल उभारत आहेत. ज्याचा फायदा या जिल्ह्यातील बांधवाना होणार आहे. आपण नगरवासीय केव्हा एकत्र येणार? आपली एकजूट केव्हा होणार?
आपल्या नगर जिल्ह्यातील अनेक बांधव पिंपरी चिंचवड शहरात नोकरी, उद्योगधंदे व इतर कामानिमित्त स्थायिक झालेलं आहेत. आपल्या बांधवाना एकाच छताखाली एकत्र आणण्यासाठी अहमदनगर जिल्हा मित्र मंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे. या मंडळाच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यातील बांधवांच्या अडी-अडचणी, रोजगाराबाबत मार्गदर्शन व नवउद्योजकांना पाठबळ देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच आपल्या जिल्ह्यातील बांधवांना अहमदनगर जिल्हा मित्र मंडळाच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आदींबाबत व्यक्त होण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे. यासाठी आपल्या नगर जिल्ह्यातील बांधवानी आपल्या जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी एकत्र आले पाहिजे. आपला व आपल्या जिल्ह्याचा उत्कर्ष साधण्यासाठी गुरुवार (दि. १३ डिसें) रोजी आपल्या जिल्ह्यातील बांधवासाठी मोठी बैठक आयोजित केली आहे. या बैठकीसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन उद्योजक अमित गोरखे यांनी केले आहे.
बैठकीचे नियोजन व आभार समन्वयक रवी शेळके यांनी केले.












