न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (देि. ०६ ऑक्टोबर २०२०) :- शहरात विविध ठिकाणी झालेल्या तीन घरफोडीमध्ये लाखोंचा ऐवज चोरीस गेला आहे. सोन्याचे दागिने, रोख रक्कम, सीसीटीव्ही कॅमेरा अशा वस्तूंचा समावेश आहे.
मुलीला सोडण्यासाठी बाहेरगावी गेलेल्या कुटुंबाच्या घरातील ६ लाख १९ हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याची घटना चिंचवडमधील वाल्हेकरवाडी येथील गुरुदत्त सोसायटीत घडली. संगीता हनुमंत गोफणे (वय ५०) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. चोरट्याने दरवाजाचा कडी कोयंडा गेट उचकटून कपाटातील पाच आणि पावणे तीन तोळे वजनाचे गंठण, एक तोळा वजनाच्या दोन वळ्याच्या अंगठ्या, कानातील आभूषणे, गुलाबी आणि हिरव्या रंगाचे खडे, रोख दहा हजार असा ६ लाख १९ हजार ६०० रुपयांचा ऐवज चोरीस गेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
सुधीर माधवराव टकले (वय ४२, रा. भोसरी) यांच्या घराचा कडी कोयंडा उचकटून कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोख १५ हजार रुपये असा १.८७ लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेला.
खेड तालुक्यातील कोये येथील बंद बंगल्यातील सीसीटीव्ही कॅमेरा, कॅमेऱ्याची मशीन, सेट टॉप बॉक्स असा १७,५०० रुपयांचा ऐवज चोरीस गेला. सुदाम जयवंत गोगावले (सध्या रा. कस्तुरकुंज कॉलनी, शिवाजीनगर) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.















