न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ डिसें.) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाची केवळ पालथ्या घड्यावर पाणी अशी अवस्था झाली असून, केवळ दिखावूपणा दाखवून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ चालू आहे. शहरात स्वाईन फ्लू, डेंगू, चिकनगुनिया, मलेरिया आदी रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. शहरातील नागरिक आरोग्याच्या तक्रारी घेऊन महापालिकेचे रुग्णालय गाठतात. ऐनवेळी त्यांच्याकरीता महापालिका रुग्णालयाच्या खाटाच अपुऱ्या पडतात. परंतु, रोगांचा प्रादुर्भाव वाढूच नये, याकरीता आरोग्य विभाग मात्र दिखावू कार्यवाही करते. हे सर्व आरोग्य विभाग सुस्त असल्याची लक्षणे आहेत.
पिंपरी चिंचवड शहरातील मासुळकर कॉलनी, अजमेरा, वस्तू उद्योग, झिरो बॉईज चौक या परिसरात डासांचा उच्छाद वाढला असून, डेंगू, मलेरियाच्या तापाने येथील नागरिक फणफणले असल्याच्या तक्रारी येत आहेत. याची दखल घेत पिंपरी चिंचवड शिवसेनेचे भोसरी विभागप्रमुख प्रदीप चव्हाण यांनी क प्रभागाचे प्रशासन व आरोग्य अधिकारी यांची भेट घेतली व त्यांना मागणीचे निवेदन दिले आहे. यावेळी शिवसेनेचे संभाजी मासुळकर, कुणाल जगनाडे, दत्तात्रय भालेराव, चंद्रकांत कणसे, अनिल कोकिरकर, बापू पवार आदी उपस्थित होते.
यात आरोग्य विभागाने डेंग्यू अळ्यांची तपासणी मोहीम व औषध फवारणी करण्याची मागणी केली आहे. याकरीता आरोग्य विभागाने त्वरित पाऊले न उचलल्यास शिवसेना योग्य त्या मार्गाने आपले आस्तित्व दाखवून देणार असल्याचे, प्रदीप चव्हाण यांनी निवेदनात नमूद केले आहे.












