- कार्यकर्त्यांच्या जोर बैठक सुरु…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ ऑक्टोबर २०२०) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला घवघवीत यश मिळवून देण्यासाठी भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी जोरदार शड्डू ठोकले आहे. मध्यंतरी शहराच्या दौऱ्यावर आलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष व खासदार शरद पवार यांनी माजी आमदार लांडे यांना कामाला लागण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार लांडे यांनी आगामी महापालिका निवडणुकीसाठी पक्षाची मजबूत बांधणी सुरू केली आहे.
पूर्ण ताकदीने मैदानात उतरून लांडे यांनी भोसरी विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या बैठकांचा धडाका लावला आहे. या बैठकांना कार्यकर्त्यांसोबतच नागरिकांचाही मिळणारा प्रतिसाद पाहता आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीच पुन्हा सत्तेत येणार, असा विश्वास माजी आमदार लांडे यांनी व्यक्त केला आहे.
महापालिकेच्या आगामी निवडणुकीला अद्याप १३ ते १४ महिन्यांचा अवधी बाकी आहे. परंतु, पिंपरी-चिंचवड महापालिकेत पुन्हा राष्ट्रवादीची सत्ता आणण्यासाठी माजी आमदार विलास लांडे यांनी आतापासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे. धनशक्तीमुळे विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव आणि मध्यंतरी आई-वडिलांचे झालेले निधन याचे दुःख विसरून लांडे यांनी आता पक्ष कार्याला झोकून दिले आहे. त्यांनी गेल्या चार दिवसांपासून भोसरी विधानसभा मतदारसंघाचा झंझावाती दौरा सुरू केला आहे. मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यात कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्याचा धडाका लावला आहे. लांडे सक्रिय झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमधील उत्साहाचा प्रत्यय भोसरी विधानसभा मतदासंघात सोशल मीडियावर दिसू लागला आहे. लांडे यांच्या समर्थनार्थ कार्यकर्ते सोशल मीडियावर सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. लांडे यांनी गेल्या आठवडाभरात मतदारसंघातील प्रत्येक भागात कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या. या बैठकांना नागरिकही स्वयंस्फूर्तीने उपस्थित राहू लागल्याचे चित्र आहे. या बैठकांमध्ये आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षासाठी करावयाचे काम व तयारीचा आढावा घेतला जात आहे. तसेच मी सदैव कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे असल्याचा लांडे विश्वास देत आहेत. कार्यकर्ते देखील विधानसभा निवडणुकीत आपला पराभव फक्त धनशक्तीमुळे झाल्याचे मान्य करून आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला मताधिक्याने विजयी करण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करण्याचे वचन लांडे यांना देत आहेत.महापालिकेतील सत्ताधारी भाजपने गेल्या पाच वर्षांत भोसरी विधानसभा मतदारसंघात एकही नवीन काम उभे केलेले नाही. जनतेला केवळ भूलथापा मारण्याचे काम केले आहे. २०२० हे वर्ष संपत आले तरी मतदारसंघातील जनतेला अजूनही व्हिजन २०२० चेच गाजर दाखविले जात आहे. सोशल मीडियावर दाखविले जाणारे हे गाजर केवळ दिखाऊपणा आहे, याची जनतेला जाणीव झालेली आहे.
लांडे हे आमदार असताना जी विकासकामे आणि प्रकल्प सुरू होते, तीच पाच वर्षे झाली तरी सुरू आहेत. आता जनतेला भाजपच्या भुलथापा समजू लागल्या आहेत. जनतेने विधानसभेला केलेली चूक महापालिका निवडणुकीत करू नये यासाठी घरोघरी जाऊन राष्ट्रवादीच्या काळात शहरात झालेला विकास सांगू, असे कार्यकर्ते स्वतःहून उत्स्फूर्तपणे सांगत असल्याचे लांडे यांनी सांगितले.बैठकांना कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहेच पण जनताही उपस्थित राहत आहे. या बैठकांना उपस्थित राहणारे काही सर्वसामान्य नागरिक महापालिकेतील सत्ताधारी भाजपने गेल्या पाच वर्षात केवळ फसवण्याचा कसा कारभार केला याचा पाढा वाचत आहेत. त्यामुळे शहरातील जनतेच्या मनात काय आहे?, याचीही झलक या बैठकांमधून दिसू लागली आहे. जनतेच्या मनात भाजपविरोधात रोष आहे. पक्षाची नियोजनबद्ध बांधणी करून आणि योग्य राजकीय रणनिती आखून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आगामी महापालिका निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी सज्ज आहे. आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी पुन्हा महापालिकेत सत्तेत येणारच, असा विश्वास विलास लांडे यांनी व्यक्त केला.