न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ ऑक्टोबर २०२०) :- फी भरण्यासाठी पालकांशी चर्चा करून सवलत द्यावी. मात्र, कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण थांबवू नये, असा शासनाचा आदेश असताना त्रिवेणीनगर येथील सेंट अॅन्स स्कूलच्या संस्थाचालकांनी फी न भरल्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबविले आहे, अशी तक्रार शिवसेनेचे शहर संघटक रावसाहेब थोरात यांनी केली आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सेंट अॅन्स स्कूलचे संस्थाचालक पालकांना फी भरण्याबाबत सक्ती करीत आहेत. कॉम्प्युटर, टर्म फी मागितली जात आहे. ज्यांनी फी भरली नाही अशांचे ऑनलाइन शिक्षण शाळेने बंद केले आहे. याबाबत पालक संघ शाळेत जाब विचारण्यास गेला असता त्यांना शाळेत येण्यास मनाई करण्यात आली.
ऑनलाइन शिक्षणाची लिंक येत होती. आमच्या मुलांना काही कळत नाही, अशी तक्रार केली होती. मात्र, शाळा प्रशासनाने याची दखल घेतली नाही. फक्त फीची मागणी केली जात होती. जूनपासून आमच्या मुलांना शिक्षणच नाही. शाळा व्यवस्थापनाने ऑनलाइन शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत पोहचत आहे की नाही याची चौकशी न करता अचानक परीक्षेसंबंधी फोन केला. आम्हाला पूर्वसूचना न दिल्यामुळे पाल्याचे नुकसान होत आहे, असे एका पालकाने सांगितले. याबाबत संस्था चालक सी.जे. फ्रान्सिस यांना संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.