- गटनेते राहुल कलाटे यांच्या मागणीची महामार्ग व्यवस्थापनाकडून दखल…
न्यूज पीसीएसमी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ ऑक्टोबर २०२०) :- वाकडमधून जाणाऱ्या एक्स्प्रेस हायवे परिसरातील सेवा रस्त्याची दुर्दशा झाली होती. त्यामुळे रस्त्यावरील खडी वर येऊन वाहने घसरून अपघात होण्याचे प्रमाण वाढले होते. स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. याकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी जागोजागी फलक लावले होते.
त्या तक्रारीची दखल घेत आज गुरुवारी राष्ट्रीय महामार्गाचे व्यवस्थापक अनिल गोरड, कॅन्सटन्ट टीम लीडर जि.सि.झा, रिलायन्स प्रकल्प व्यवस्थापक राकेश कोळी, मनपाचे स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता गट्टेवार, मनपाचे इतर अधिकारी यांनी शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांच्यासह घटनास्थळी भेट देऊन ताथवडे येथे पुलाखाली साचलेल्या पाण्याची व वाकड, ताथवडे, पुनावळे येथील सेवा रस्त्यामध्ये पडलेल्या खड्यांची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.
महामार्ग व्यवस्थापक अनिल गोरड यांनी तूर्तास आम्ही काम करून देऊ व आम्हास डायव्हरशनची परवानगी दिल्यास आम्ही ताथवडे व पुनावळे येथे नवीन पुलही बांधून देऊ, असे आश्वासन दिले.
राहुल कलाटे यांनी पाहणीसाठी आलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांसोबत पालिकेचे स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता गट्टेवार यांना पालिका आयुक्त श्रावण हार्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील पाठपुरावा करण्याच्या सुचना केल्या. यावेळी स्थानिक नागरिक उपस्थित होते.












