- पालिकेचे ‘फ’ प्रभाग स्विकृत सदस्य दिनेश यादव यांची राज्य सरकारकडे मागणी…
न्यूज पीसीएसमी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ ऑक्टोबर २०२०) :- चिखली गावाला ऐतिहासिक वारसा आहे आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या वैकुंठगमनी त्यांच्या टाळ चिखलीत पडल्या होत्या. म्हणून याला टाळगाव असेही संबोधन आहे. त्या चिखली गावाच्या भैरवनाथ मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा, अशी मागणी पालिकेच्या ‘फ’ प्रभागाचे स्विकृत सदस्य दिनेश यादव यांनी राज्य सरकारकडे केली आहे. आमदार महेशदादा लांडगे यांच्या प्रयत्नातून असा दर्जा मिळवू असा विश्वास दिनेश यादव यांनी व्यक्त केला आहे.
याबाबत दिनेश यादव यांनी राज्याच्या सांस्कृतिक आणि पर्यटन विभागाला लेखी पत्राद्वारे भैरवनाथ मंदिर तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करा अशा आशयाचे पत्र लिहिले होते.मंत्रालय स्तरावरून या पत्राची दखल घेत कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. भैरवनाथ मंदिर जागृत देवस्थान म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून गावाची परंपरा जपत या मंदिराच्या आख्यायिका सर्वदूर आहेत.
त्यामुळे पुढील काळात मंदिर तीर्थक्षेत्र म्हणून घोषित होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे चिखलीचा नावलौकिक वाढायला निश्चितच लाभ होईल असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे, अशी माहिती यादव यांनी दिली आहे.












