- शहरवासियांमध्ये केवळ ३३.९ टक्केच पॉझिटिव्ह आय.जी.जी.ऍन्टीबॉडीज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२. नोव्हेंबर २०२०) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये कोविड १९ रोगाचा प्रार्दुभाव किती झाला आहे. हे पाहण्याकरिता तसेच किती लोकांमध्ये याबाबत रोग प्रतिकार शक्ती निर्माण झाली, यासाठी महापालिका व डॉ .डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज आणि रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने नागरिकांची सार्स – कोविड -२ आय.जी.जी.ऍन्टीबॉडीज तपासणी मोहिम राबविण्यात आली होती. ही मोहीम दि. ७ / १० / २०२० ते १७/१०/२०२० दरम्यान राबविण्यात आली होती. या सर्वेक्षणाबाबत माहिती देण्यासाठी आज सोमवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे, आयुक्त श्रावण हर्डीकर, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, सत्तारुद्ध पक्षनेता नामदेव ढाके, विरोधी पक्षनेता राजू मिसाळ, नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, अतिरिक्त आयुक्त अजित पवार, अतिरिक्त आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ. पवन साळवे, सहाय्यक आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, महिला वैद्यकिय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, कोविड तांत्रिक समिती सल्लागार डॉ. सुभाष साळुखे, डॉ.डी.वाय.पाटील मेडिकल कॉलेजचे डॉ. अमित बॅनर्जी डॉ. भार्गव गायकवाड, डॉ.अतुल देसले आदी उपस्थित होते.
मोहिमेच्या सर्वेक्षणासाठी १० पथके तयार करण्यात आलेली होती. या पथकाकडून हे सर्वेक्षण १० दिवस करण्यात आले असून ५००० नागरिकांचे रक्त नमुने घेण्यात आले होते. मोहिमेच्या सर्वेक्षणासाठी घेतलेल्या नमुन्यांची आय.जी.जी.ऍन्टीबॉडीज तपासणीसाठी आय.सी.एम.आर व्दारे प्रमाणित अबॉट सीएमआयए टेस्ट व्दारा करण्यात आली आहे.
सर्वेक्षणामध्ये पॉझिटिव्ह आय.जी.जी.ऍन्टीबॉडीज खालील प्रमाणे आढळून आलेल्या आहेत :-
नागरिकांमध्ये सर्वसाधारण ३३.९ %, झोपडपट्टी भागातील नागरिकांमध्ये ३७.८ % , झोपडपट्टी सदृश भागातील नागरिकांमध्ये ३८.३ % , गृहनिर्माण सोसायटी भागातील नागरिकांमध्ये २७.७ % , पॉझिटिव्ह आय.जी.जी.ऍन्टीबॉडीज महिलामध्ये दर ३३.८ % , पॉझिटिव्ह आय.जी.जी.ऍन्टीबॉडीज पुरुषांमध्ये दर २८.९ %. महिलांमधील पॉझिटिव्ह आय.जी.जी.ऍन्टीबॉडीज चा दर पुरुषांपेक्षा जास्त आहे. पॉझिटिव्ह आय.जी.जी.ऍन्टीबॉडीज वयानुसार ५१ ते ६५ वर्षाच्या नागरिकांमध्ये जास्त प्रमाणात आढळून आले असून त्याचा दर ३५.५ % इतका आहे. किशोरवयीन १२ ते १८ वर्षाच्या मुला मुलींमध्ये ३४.९ % इतका आहे. १९ ते ३० वयोगटामध्ये २९ .७ % , ३१ ते ५० वयोगटामध्ये ३१.२ % व ६६ वर्षांवरील नागरिकांमध्ये २८.२ % इतका आहे. कोविड -१९ मुळे असणारा सर्वसामान्य मृत्यु दर ०.१८ % इतका आहे.
या सर्वेक्षणामध्ये असे दिसून आले आहे की, पिंपरी चिंचवड शहरातील ब-याच मोठया प्रमाणातील लोकसंख्येमध्ये पॉझिटिव्ह आय.जी.जी.ऍन्टीबॉडीज दिसून आलेल्या आहेत. परंतु भविष्यात दिवाळी सण व हिवाळा असल्याकारणामुळे कोरोना विषाणूंचे संक्रमण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी मास्क वापरणे, सुरक्षित अंतरभान ठेवणे आणि हात वारंवार धुणे आदी कोरोना विषयक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन पालिकेच्या सहा.आरोग्य वैद्यकिय अधिकारी यांनी केले आहे.