न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ नोव्हेंबर २०२०) :- गणेशोत्सवानंतर जिल्ह्यात ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात कोरोनाची लाटच आली होती. यामुळेच ३० सप्टेंबर रोजी गंभीर रुग्णांची संख्या तब्बल ३ हजार ९६२ जाऊन पोहचली होती. यामुळेच एकट्या पुणे जिल्ह्यात दिवसाला सुमारे १४२.९३ टन ऑक्सिजन मागणी होती. परंतु दिवाळीच्या तोडावर रुग्ण संख्या आणि ऑक्सिजनच्या मागणी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.
३१ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यात गंभीर रुग्णांची संख्या १ हजार ६५५ ऐवढी तर ऑक्सिजनची मागणी ६१.२२ टनपर्यंत खाली आली आहे. पुणे जिल्ह्यासह विभागातील अन्य जिल्ह्यांमध्ये देखील ऑगस्ट , सप्टेंबर मध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. पुण्यात नगर, नाशिकसह सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील गंभीर रूग्ण देखील जिल्ह्यात उपचारासाठी दाखल होत आहेत. यामुळेच पुणे जिल्हात ऑक्सिजनच्या मागणीत अचानक मोठी वाढ झाली व ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला.
सर्व प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आणि जवळजवळ एक – दीड महिना सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सर्व यंत्रणा ऑक्सिजन उत्पादन, रिफीलींग सिलेंडर, पुरवठा यावर लक्ष देत होते. यासाठी जिल्ह्यातील ऑक्सिजन उत्पादकांची क्षमता वाढवणे व पुरवठ्यावर नियंत्रण ठेऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.