न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० नोव्हेंबर २०२०) :- पिंपरी -चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दवाढीत खेड तालुक्यातील काही गावे समाविष्ट करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. परंतु, खेड तालुक्यातील गावांचा महानगरपालिका हद्दीत समाविष्ट होण्यास विरोध आहे. त्यापेक्षा चाकण, राजगुरुगर, आळंदी मिळून स्वतंत्र महानगरपालिका करा अशी भूमिका या गावांची आहे
पिंपरी – चिंचवड वा महानगरपालिकेच्या हद्दीवाढीसाठी शासकीय पातळीवर वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत. यामध्ये हवेली, मावळ, मुळशी व खेड तालुक्यातील आळंदी, चिंबळी, कुरुळी, निघोजे, मोई, म्हाळुंगे, मेदनकरवाडी, नाणेकरवाडी, खराबवाडी या गावांचा समाविष्ट करावा यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका अनूकूल आहे. तसा प्रस्ताव तत्कालीन आयुक्तांनी राज्यसरकारकडे पाठवला आहे. परंतु, यावर आजपर्यंत काहीही कार्यवाही झाली नाही.
चाकण नगरपरिषदेची हद्दवाढ करून खेड तालुक्यातील सोळा गावे मिळून चाकण नगरपालिका करण्यात यावी हा प्रस्ताव पाच वर्षांपासून प्रलंबित आहे. चाकण नगरपालिकेबरोबरच पिंपरी – चिंचवड महापालिकेतही समाविष्ट होण्यास या सोळा गावांचा विरोध आहे. वरील गावांतील ग्रामपंचायतीने ही ठराव करून पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत गावे समाविष्ट करण्यास विरोध केला आहे.