न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० नोव्हेंबर २०२०) :- महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून नवीन वाढीव मिळकती, वापरात बदल झालेल्या मिळकतींचे सर्वेक्षण करण्यास सुरुवात झाली आहे. महापालिकेकडून वाढीव मिळकतींचा शोध सुरू आहे.
पिंपरी – चिंचवड महापालिकेची शहरात १६ विभागीय कार्यालये आहेत. त्यांच्यामार्फत इमारती व जमिनीची कर आकारणी करण्यात येते. सर्वेक्षणासाठी एका संस्थेला काम दिले आहे. संस्थेमार्फत प्रथम सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यानंतर मिळकतींना भेट देऊन तपासणी करण्यात येणार आहे. नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे मागविण्यासाठी नोटीस बजावली जाणार आहे. त्यानंतर तीन दिवसांच्या मुदतीनंतर पुन्हा भेट देऊन कागदपत्रे व मोजमाप करण्यात येईल.
मिळकतकर विभागाचे उपायुक्त स्मिता झगडे म्हणाल्या, मिळकतींचे सर्वेक्षणासाठी अॅप विकसित केले असुन त्यामध्ये मिळकतींची माहिती भरली जाणार आहे. तसेच छायाचित्रही अपलोड केले जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी अचूक माहिती देणे आवश्यक आहे. मिळकतधारक यांनी अॅपमध्ये भरलेली माहिती बरोबर असल्याची खात्री करून अॅपवर डिजिटल पेनद्वारे स्वाक्षरी घेतली जाणार आहे.