- मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची आयुक्तांची मागणी
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ डिसें.) :- पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची स्थापना १५ ऑगस्ट रोजी झाली आहे. स्थापनेपासूनच चिंचवड येथील आयुक्तालयाच्या इमारतीचे रेंगाळलेले काम, अपुरी व नादुरुस्त वाहने, आयुक्तालयाच्या इमारतीचे संथ गतीने सुरु असणारे काम आणि तुटपुंजे मनुष्यबळ यामुळे आयुक्तालयासमोर मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत.
पोलीस निरीक्षकांपासून अनेक वरिष्ठ व अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांनाही कामचलाऊ वाहने देण्यात आली होती. तर अनेक पोलीस ठाण्यांमध्ये वाहनांची कमतरता भासत होती. याबाबत पोलीस आयुक्तांपासून स्थानिक आमदार खासदारांनीही मोठा पाठपुरावा केला होता. तसेच अतिरिक्त आयुक्त मकरंद रानडे यांनी चिखली पोलीस ठाण्याच्या उदघाटनप्रसंगी पुणे आणि पिंपरी पोलीस आयुक्तालयाच्या मनुष्यबळाची संख्यात्मक तुलना करून ही बाब पालकमंत्री गिरीश बापट यांच्या लक्षात आणून दिली होती.
याबाबत थेट मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार विशेष समिती स्थापन करण्यात येणार आहे. याबाबत महाराष्ट्र पोलीस मुख्यालयात आज मंगळवार (दि. ११) रोजी बैठक होणार आहे. यात ग्रामीण पोलीस अधीक्षक, पुणे पोलीस आयुक्त व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त उपस्थित राहणार आहेत.












