- पोलीस आयुक्तांचा जाणीवपूर्वक कामांमध्ये अडथळे निर्माण करणाऱ्यांना इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ डिसेंबर २०२०) :- पिंपरी – चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडकडून शहरात स्मार्ट सिटीची कामे सुरू आहेत. या कामांना काही ठिकाणी विरोध होत आहे. या कामास विरोध करणाऱ्यांवर सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हे दाखल करू, असा इशारा पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिला आहे.
पिंपरी – चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या संचालक मंडळाची अकरावी बैठक चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे झाली. कृष्ण प्रकाश म्हणाले, ‘स्मार्ट सिटी अंतर्गत सुरु असलेल्या कामांमध्ये काही ठिकाणी खोडा घातला जात आहे.
जाणीवपूर्वक विरोध केल्याचे प्रकार प्रशासनाच्या निदर्शनास येत आहेत. अशा विरोधामुळे कामास विलंब होत आहे. यामुळे संचालक मंडळाच्या बैठकीत मुद्दा उपस्थित करण्यात आला. जाणीवपूर्वक कामांमध्ये अडथळे निर्माण करणाऱ्यांवर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याच्या कलमाखाली गुन्हे दाखल केला जाईल, असे ते म्हणाले.