- आता पालिकेच्या सभेसह विविध विषय समित्यांच्या सभा होणार पूर्वीप्रमाणे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ डिसेंबर २०२०) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेची सर्वसाधारण सभेसह विविध विषय समिती सभा घेण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे यापुढे सर्व नगरसेवकांना सभेला उपस्थित राहता येणार आहे. पूर्वीप्रमाणेच सभा आयोजित करता येणार आहे. परिणामी ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सभेस उपस्थित राहण्याच्या अटीतून नगरसेवकांची आणि प्रशासनाची सुटका झाली आहे.
कोरोना विषाणू संसर्ग होऊ नये म्हणून पालिका सभा व विषय समिती सभा व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून घेतली जात आहे. त्यामुळे अनेक सदस्यांना सभेला इच्छा असूनही उपस्थित राहता येत नव्हते.
दरम्यान, नगर विकास विभागाने व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे महापालिका सभा घेण्याची अट सोमवारी (दि. २१) दिलेल्या आदेशानुसार शिथिल केली आहे. मात्र, तोंडाला मास्क लावणे व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याची अट कायम ठेवली आहे, अशी माहिती नगरसचिव उल्हास जगताप यांनी दिली.