- जिल्हा उप निबंधक बी. टी. लावंड यांचा पतसंस्थेवर कारवाई करण्याचा इशारा
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ डिसें.) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील कर्मचारी व अधिकाऱ्यांना कमी दरात कर्ज पुरवठा व अन्य सुविधा पुरवण्यासाठी पतसंस्थेची स्थापना केली आहे. कर्मचारी महासंघाचे विद्यमान अध्यक्ष बबन झिंजुर्डे यांना या पतसंस्थेवर तज्ज्ञ संचालक म्हणून घेण्यात आले आहे. या नियुक्तीवर पतसंस्थेचे माजी संचालक गणेश भोसले यांनी हरकत घेतली आहे.
झिंजुर्डे यांना तीन अपत्य असल्याने त्यांची ही नियुक्ती अवैध असून ती रद्द करण्याची मागणी केली आहे. तज्ज्ञ संचालक झिंजुर्डे यांना कोणतेही अधिकार नसताना ते पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांची अनधिकाराने सभा घेतात. लेखा परिक्षकांची नेमणूक, खरेदी, नोकर भरती, कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते, बोनस, अनुदान, प्रमोशन, रजा किंवा कारवाई, सभासदांना कर्ज मंजूर करणे, नाकारणे हे निर्णय ते घेत असल्याची तक्रार भोसले यांनी जिल्हा उप निबंधक कार्यालयाकडे केली होती.
या तक्रारीची दखल घेऊन नेमकी काय स्थिती आहे, याचा खुलासा जिल्हा निबंधक कार्यालयाने पतसंस्थेकडून मागवला होता. मात्र, अद्यापही पतसंस्थेने खुलासा सादर केला नाही, जिल्हा उप निबंधकांनी मागवलेला खुलासा वेळेत सादर न केल्याने पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्थेवर कारवाई करण्याचा इशारा जिल्हा उप निबंधक बी. टी. लावंड यांनी दिला आहे.
माझ्या अनुभवाचा फायदा या पतसंस्थेला व्हावा, या हेतूने संचालक मंडळाने माझी तज्ज्ञ संचालकपदी नियुक्ती केली आहे. त्याकरिता मी कोणतीही निवडणूक लढवलेली नाही. केवळ विरोध करायचा म्हणून गणेश भोसले यांनी ही तक्रार केली आहे. – बबन झिंजुर्डे (तज्ज्ञ संचालक, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्था)












