न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ डिसें.) :- पिंपरी चिंचवड शहरात गेल्या काही दिवसांपासून अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला असून, शहरातील कष्टकरी, सर्व-सामान्य गोरगरीब नागरिक व विद्यार्थी वर्ग या अवैध धंद्याकडे खेचला जाऊन, संसाराची राख-रांगोळी करून घेत आहे. याची दखल घेत बहुजन सम्राट सेनेचे अध्यक्ष संतोष निसर्गंध यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त आर. के. पज्ञनाभन यांची (४ डिसें) रोजी भेट घेतली. शहरातील विविध ठीकाणी चालू असलेल्या अवैध धंद्यांचे पुराव्यासह त्यांना निवेदनही दिले होते व संबंधीतांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली होती.
पोलीस आयुक्तांनी या मागणीस केराची टोपली दाखविली असून, अवैध धंद्यांवर कोणत्याही स्वरुपाची कारवाई केलेली नाही. शहरात विविध ठिकाणी मटका व्यवसाय तेजीत आहेत. तसेच परिसरात जुगार व आदी अवैध धंदे बिनबोभाट चालू आहेत. यामुळे गुंडगिरीला प्रोत्साहन मिळत असून, शहरातील कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघालेले आहेत. तरीही पोलीस आयुक्त गप्प आहेत. पोलीस आयुक्तांची ही भूमिका संशयास्पद असल्याचे या कृतीवरून प्रथमदर्शनी दिसत आहे.
या कृतीच्या निषेधार्थ बहुजन सम्राट सेने च्या वतीने उद्या गुरुवार (दि. १३) रोजी सकाळी ११.३० वाजता पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यालयासमोर जनआंदोलन करणार असल्याचे, अध्यक्ष संतोष निसर्गंध यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.












