- अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसची आयुक्तांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ डिसेंबर २०२०) :- सध्या जगभरात चालू असलेल्या करोना महामारीच्या काळात आपल्या जिवाची बाजी लावून शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेवून नागरिकांसाठी अहोरात्र झटणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाचा प्रश्न प्रलंबित आहे. शासन निर्णय क्र. सकानि २००७ / प्र.क्र .१७६/२२०६ / नवी-६ नुसार सफाई कामगार जे आपले आरोग्य धोक्यात घालून शहर स्वच्छ ठेवून समाजाची सेवा करीत आहेत, अशा सफाई कर्मचाऱ्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी राज्यातील नगरपालिका / महानगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांना सेवा निवृती च्यावेळी स्वतःच्या मालकी हाक्काच्या मोफत सदनिका देणे तसेच सेवेत असताना त्यांच्याकरिता सेवानिवस्थाने बांधण्यास चलना देण्याबाबत शासनाने निर्णय घेतलेला आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील सफाई कर्मचाऱ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेच्या अंतर्गत ज्या सफाई कर्मचाऱ्यांची सेवा २५ वर्ष किंवा त्याहून अधिक झाली आहे, अशा सफाई कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या वेळी अथवा सफाई कर्मचा-यांचा सेवेत असताना मृत्यु झाल्यास अशा सफाई कर्मचाऱ्यांच्या निधनानंतर त्यांच्या वरसांना मालकी हक्काच्या २६९ चौ. फुट चटई क्षेत्राच्या मोफत सदनिका देण्यात याव्यात. हा शासन नियम असूनही अद्याप सदरील आदेशाची अंमलबाजवणी झाल्याचे दिसून येत नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेच्या अंतर्गत पिंपरी चिंचवड शहरात (एस.आर.ए.) अंतर्गत (आय.एच.एस.डी.पी) अंतर्गत (बी.एस.यू.पी) अंतर्गत तसेच म्हाडाच्या अल्प – उत्पन्न गटाच्या गृहनिर्माण योजनेअंतर्गत सदनिकांचे १५ % आरक्षण शहरातील सफाई कर्मचाऱ्यासाठी ठेवण्यात यावे. तसेच सफाई कर्मचाऱ्यांच्या गृहनिर्माणासाठी मंजूर विकास अराखड्यात आरक्षण असलेल्या भूखंडावर तसेच मंजूर विकास अराखड्यात कोणतेही आरक्षण नसलेल्या मात्र सफाई कर्मचाऱ्यांसाठी सेवा निवस्थाने किंवा सेवा निवृतीनंतर मोफत द्याव्याच्या सदनिका बांधण्यासाठी निवडलेल्या भूखंडावर बांधलेल्या योजनांमधील सदनिका लवकरात लवकर पात्र लाभार्थ्यांना देण्यात येवून, त्या पात्र लाभार्थ्यांची नावे व तपशील आमच्या संघटनेकडे देण्यात यावा, अशी मागणी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष अॅड. सुशिल मंचरकर यांनी पालिका आयुक्त हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.











