- भाजपशी जुळवून घेतल्याचा महाविकास आघाडी काढतेय वचपा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जानेवारी २०२१) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांना स्थानापन्न पदोन्नती मिळाली आहे. त्यांच्यावर भाजपाधार्जिणे शिक्का बसल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकारने त्यांना नवीन विभाग दिलेला नाही. त्यामुळे नाईलाजास्तव त्यांना पालिका आयुक्त म्हणूनच पुढील काही महिने काम करावे लागणार आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील अधिकारी म्हणून हर्डीकर यांची भाजपची सत्ता असलेल्या पिंपरीत ओळख होती. महापालिकेच्या आयुक्तपदी फडणवीस यांनी नियुक्ती केली. त्यांनी आयुक्तपदाचा कार्यभार २७ एप्रिल २०१७ ला स्वीकारला. त्याचा ३ वर्षांचा कार्यकाळ २६ एप्रिल व २०२० ला संपला. मात्र, कोरोना महामारीमुळे त्यांना काही महिने मुदतवाढ मिळाली. नियमानुसार जानेवारीला पदोन्नती देण्यात आली आहे. मात्र, नवीन विभाग देण्यात आलेला नाही. ते पालिका आयुक्त म्हणूनच काम पाहतील, असा आदेश सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव (सेवा) यांनी बुधवारी (दि. ३०) काढला.
भाजपधार्जिणे असल्याने पालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस व शिवनेसेचे पदाधिकारी आयुक्तांवर नाखूष आहेत. सत्ताधाऱ्यांच्या मर्जीप्रमाणे ते वागत असून, नियमबाह्यपणे अनेक कामांना मंजुरी दिली आहे. स्मार्ट सिटी अंतर्गतही कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचे आरोप त्यांच्यावर आहेत. भाजप पदाधिकाऱ्यांना साथ देत असल्याने त्यांच्यावर अनेक आरोप विरोधकांनी वारंवार केले आहेत. त्यामुळेच त्यांना महाविकास आघाडीने नवीन विभाग दिला नसल्याचे बोलले जात आहे. नाईलाजास्तव त्यांना आयुक्त म्हणूनच काही महिने काम करावे लागणार आहे.












